विधानसभा निवडणुकीच्या निकालाला १८ दिवस उलटल्यानंतरही राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. राज्यपालांनी भाजपाला सत्तेस्थापनेसाठी शनिवारी आमंत्रण दिले होते. मात्र शिवसेना सोबत नसल्याने सत्ता स्थापन करणार नाही अशी भूमिका भाजपाने घेतली आहे. त्यामुळेच आता शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापनेच्या हलचाली सुरु केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचे समर्थक कमेकांवर टीका करताना दिसत आहेत. त्यातच राष्ट्रवादी आणि भाजपाच्या समर्थकांची चांगलीच जुंपल्याचे चित्र सोशल मिडियावर दिसत आहे. राष्ट्रवादीच्या काही समर्थकांनी राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राष्ट्रवादीची फिरकी घेताना केलेल्या वक्तव्यांचा आधार घेत भाजपावर निशाणा साधला आहे.

गणिताच्या पुस्तकात संख्या वाचन करण्याच्या पद्धतीवर राष्ट्रवादीने केलेल्या टीकेला उत्तर देताना फडणवीस यांनी २० जून रोजी उत्तर देताना मजेदार वक्तव्य केलं होतं. दादा कमळ बघ, छगन कमळ बघ, हसन झटकन उठ, शरद गवत आण असे बालभारती पहिलीच्या पुस्तकातले उतारे फडवीस यांनी वाचून दाखवले होते. ज्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. मी कोणत्याही सदस्यावरून बोलत नाही जे लिहिलं आहे ते वाचून दाखवल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. आता हाच व्हिडिओ वापरुन राष्ट्रवादी समर्थकांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. “त्यांनी (शरद पवारांनी) कमळाकडे बघितले अन तुमचा (फडणवीसांचा) हा (व्हि़डिओत दिसणार) माजच उतरवून टाकला,” अशी कॅप्शन देत राष्ट्रवादी समर्थकांनी भाजपावर टीका केली आहे.

तेव्हा नक्की काय घडलं होतं

बालभारतीने संख्या वाचनाच्या नवीन पद्धतीवरुन पावसाळी अधिवेशनामध्ये चांगलाच वाद रंगला होता. संख्या वाचनाच्या नवीन पद्धतीवर विरोधक चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले. ‘नव्या संख्यावाचन पद्धतीनुसार उर्जामंत्री बावनकुळे यांना हाक मारताना ओ पन्नास दोनकुळे साहेब अशी हाक मारायची का? किंवा पन्नास दोनकुळे साहेब आले असं म्हणायचं का? आणि मुख्यमंत्र्यांचं आडनाव फडण दोन शून्य अशा पद्धतीने घ्यायचं का?’ असे प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केले होते. ज्यानंतर या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जशास तसे उत्तर दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात पहिलीच्या पुस्तकातला उतारा वाचून दाखवला होता. यावेळेस त्यांनी ‘दादा कमळ बघ, छगन कमळ बघ, शरद गवत आण, हसन झटकन् उठ’ अशी वाक्य वाचून दाखवल्याने सभागृहातल्या सगळ्याच आमदारांना आणि नेत्यांना हसू अनावर झालं होतं. तसंच संख्यावाचनाच्या पद्धतीबाबत आक्षेप असतील तर त्यासाठी विशेष समिती नेमली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.

काय होते हे प्रकरण?

बालभारतीने दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात संख्या वाचनाचे नियम बदलले. गणिताच्या मराठी वाचनात यापुढे संख्या वाचन करताना २१ चा उच्चार एकवीस असा नाही तर वीस एक असा करण्यात आला. त्याचप्रमाणे बावीसचा उच्चार वीस तीन, तेवीसचा उच्चार वीस तीन, चोवीसचा उच्चार वीस चार अशा रितीने हे उच्चार करण्यात आले. एकतीसचा उच्चार तीस एक, बत्तीसचा उच्चार तीस दोन अशा रितीने बदल करण्यात आले. संख्यावाचन करताना यापुढे विद्यार्थी ६१ या संख्येला एकसष्ट न म्हणता साठ एक म्हणतील, ६२ या संख्येला बासष्ट न म्हणता साठ दोन म्हणतील इतरही उच्चार अशाच प्रकारचे असतील. मराठी जोडाक्षरं कठीण आहेत त्यामुळे त्यांचा उच्चार करणे विद्यार्थ्यांना कठीण जाते हे कारण देऊन हे बदल करण्यात आले. ज्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता.