राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. कारण शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा केला असला तरीही पाठिंब्याचं पत्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिलं नाही त्यामुळे राज्यपालांनी यासाठीची वेळ वाढवून दिली नाही. त्यामुळे दावा जरी कायम असला तरीही शिवसेनेला दिलेली मुदत संपली आहे. हे पाहता आता राज्यपालांकडून राष्ट्रवादीला बोलावण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीची भूमिका माध्यमांना सांगितली आहे.

नवाब मलिक यांनी म्हटले की, निकाल येऊन जवळपास १८ दिवस झाले, राज्यातील जनतेला वाटतं होते की लवकरच सरकार येईल. बहुमत भाजपा-शिवसेना महायुतीला होतं. मात्र दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावरून वेगळे झाले. यानंतर भाजपाने सरकार स्थापनेसाठी असमर्थता दर्शवली. यामुळे दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला राज्यपालांनी निमंत्रण दिले. त्यांना २४ तासांच्या आत सत्ता स्थापन करण्यासाठी सहमती पत्राची मागणी करण्यात आली होती.आज सकाळपासूनच राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांच्या बैठका सुरू होत्या. जसे की आम्ही या अगोदरही सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेसबरोबर आघाडी करून निवडणुकीला सामोरी गेली होती. पर्यायी सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही निश्चितपणे काँग्रेसबरोबर चर्चा करून निर्णय घेऊ, ही आमची अगोदरपासूनची भूमिका आहे.काँग्रेस कार्यकारिणी समितीची देखील बैठक पार पडली. त्यानंतर काँग्रेसकडून महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांना बोलावण्यात आले व त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी देखील त्यांची चर्चा झाली. मात्र त्यांनी असे म्हटले आहे की, आम्ही शरद पवारांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ.

या दरम्यान जो नवीन घटनाक्रम आहे, शिवसेना राज्यपालांशी भेटली व त्यांच्याकडे वेळेची मागणी केली. आम्ही अन्य पक्षांशी चर्चा करत आहोत, त्यामुळे आम्हाला वेळ वाढवून दिली जावी, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले होते. मात्र,राज्यपाल महोदयांनी स्पष्ट केले की, आम्ही तुम्हाला चोवीस तासांची मुदत दिली होती. या कालावधीत तुम्हाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या स्वाक्षऱ्यांसह नावांबरोबरच त्यांच्या विधानसभा मतदारसंघाचे नाव क्रमांक हवे आहेत. नक्कीच २४ तासांच्या आत तिन्ही पक्षांमध्ये ज्याप्रकारे सहमती व्हायला हवी होती किंवा आमदारांच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी वेळ अत्यंत कमी होती. त्यामुळे राज्यपालांनी शिवसेनेला तुमची वेळ संपली असल्याचे सांगितले.

आम्हाला देखील राज्यपालांनी बोलावले आहे व आमचे एक शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीसाठी गेले आहे. आम्हाला अशी माहिती आहे की, त्यांनी आम्हाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देण्यास बोलावले आहे. या पार्श्वभूमीवर आमचे नेते राज्यपालांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. जे पत्र राज्यपाल महोदय देतील. त्यानुसार काँग्रेसबरोबर आम्ही पुन्हा चर्चा करू. जेणेकरून राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी प्रयत्न केले जातील. आज पत्र मिळत आहे उद्या राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेसमध्ये चर्चा होईल. यानंतर अंतिम निर्णय होईल. आज पत्र मिळणार आहे, आम्ही आमचा सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार, असल्याचे मलिक यांनी सांगितले.