आमदार प्रशांत बंब यांचा आरोप

राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच मराठवाडय़ाला हक्काचे पाणी मिळू नये, यासाठी प्रयत्न केले. राष्ट्रवादीच्या या नेत्यांना विरोध केला, पण त्यांनी अडवले. त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचा आरोप आमदार प्रशांत बंब यांनी केला. राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्काचे सहकारी साखर कारखाने खासगीत सुरू करण्यासाठी चालवायला घेणे हा शेतकरीद्रोह असल्याचे सांगितले.

निवडणुकीत जातीय अंगाचा विचार होत असला, तरी अल्पसंख्याक समाजातील असूनही विजय प्राप्त करू, असा दावा करत मतदार हे जात पाहून नव्हे तर विकासात्मक केलेली कामे बघूनच मतदान करतो, असे गंगापूर-खुलताबाद मतदार संघाचे भाजपचे उमेदवार प्रशांत बंब यांनी सांगितले. मराठा आरक्षण लढय़ात विनोद पाटील यांच्या न्यायालयीन लढाईदरम्यान, आपलाही अप्रत्यक्ष सहभाग राहिल्याचा दावाही बंब यांनी केला.

मतदार संघात मागील पाच वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती देण्यासाठी मंगळवारी आयोजित पत्रकार बठकीत ते बोलत होते. मतदार संघातील २२० गावांमध्ये एक हजार ८० कोटींची रस्त्यांची कामे केल्याचे बंब यांनी सांगितले. मतदार संघात हक्काचे पाणी मिळावे, यासाठीही लढा दिला. जायकवाडी-लखमाबाद अशी जलवाहिनी टाकण्याच्या कामाला राज्यपालांकडून परवानगी मिळाली असून त्यामुळे ५४ दलघमी पाणी मिळणार आहे. त्यातून ३५ हजार एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. सर्वाधिक निधी विकासकामांसाठी खेचून आणणारा आमदार म्हणून आपण चौथ्या क्रमांकाचे असल्याचा दावाही बंब यांनी केला. महिलांसाठी स्वतंत्र २०० एकरवरील एमआयडीसी करणार असून त्यासाठी पोटूर व गणेशवाडीची शासनाच्या मालकीच्या जमिनीचा विचार सुरू आहे. या एमआयडीसीच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आणण्याचा मानस असल्याचेही ते म्हणाले.