News Flash

50:50 मुख्यमंत्री कधीही निर्णय झाला नाही – फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेत माहिती

अडीच-अडीच वर्षे हा फॉर्म्युला ठरलेलाच नाही, हे मी आजही सांगतो आहे. अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर आमची बोलणी फिस्कटली होती त्यानंतरच्या माझ्यासमोरच्या एकाही चर्चेत हा विषय झाला नाही. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात जर विषय झालेला असेल तर मला माहित नव्हतं. मी तसं अमित शाह आणि नितीन गडकरी यांना विचारलं मात्र त्यांनीही असं काहीही ठरलेलं नाही असं सांगितलं. या संदर्भातले समज-गैरसमज चर्चेने सोडवता आले असते. मात्र शिवसेनेने आमच्याशी चर्चाच केली नाही. मित्रपक्षाशी चर्चा करण्याऐवजी ते काँग्रेस राष्ट्रवादीशी चर्चा केली. ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्याशी शिवसेनेने चर्चा केली. मात्र त्यांना आमच्याशी चर्चा करावीशी वाटली नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

काही लोक जाणीवपूर्वक या ठिकाणी वक्तव्य करत आहेत. भाजपा आमदार फोडण्याचं करत आहेत असाही आरोप केला जातो आहे. माझं त्यांना खुलं आव्हान आहे की तुम्ही पुरावे द्या नाहीतर माफी मागा. सरकार स्थापन करताना आम्ही फोडाफोडीचं राजकारण करणार नाही हे आश्वासन देतो. येत्या काळात भाजपाचंच सरकार येईल हा विश्वास मी व्यक्त करतो आहे. जनतेने आमच्यावर जो विश्वास ठेवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. विरोधी पक्षांचेही मी आभार मानतो असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच राज्यपालांकडे मी राजीनामा सोपवला आहे. त्यांनी सांगेपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करणार असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

गेली पाच वर्षे उद्धव ठाकरे यांचे आणि माझे चांगले संबंध आहेत. अनेकदा मी त्यांच्याशी चर्चा नाही. मी स्वतः उद्धव ठाकरेंना फोन केले पण त्यांनी ते उचलले नाही. चर्चेची दारं आमच्याकडूून खुली होती. भाजपासोबत चर्चाच करायची नाही हे धोरण शिवसेनेचे आहे आमचे नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

माननीय राज्यपालांना भेटून राजीनामा सादर केला आहे, राज्यपालांनी तो स्वीकारला आहे. महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी गेली पाच वर्षे दिली त्याबद्दल मी महाराष्ट्रच्या जनतेचे आभार मानतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. माझ्यासोबत ज्यांनी काम केलं ते सगळे अधिकारी, कर्मचारी यांचेही मी आभार मानतो. आमच्यासोबत असलेल्या शिवसेनेचेही मी आभार मानतो. पारदर्शी आणि प्रामाणिक सरकार आम्ही चालवलं. महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम आम्ही केलं. महाराष्ट्रासमोर आलेल्या विविध संकटांचा सामना अत्यंत समर्थपणे केला.

चार वर्षे दुष्काळाची, हे वर्ष अतिवृष्टीचं ठरलं तरीही शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहण्याचं काम राज्य सरकारने केलं. महाराष्ट्रातली सर्वात मोठी योजना ती यशस्वीपणे राबवण्याची संधी आम्हाला मिळाली. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पाायाभूत सुविधांचं काम या कार्यकाळात करता आलं याचं समाधान वाटतं आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं

निवडणुकीत आम्ही लढलेल्या जागांपैकी ७० टक्के जागा लोकांनी आम्हाला दिल्या. जे काम आम्ही केलं त्या कामाची पावती महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला दिली. ज्या प्रामाणिकपणे सरकार चाललं त्या विश्वासातून जनतेने आम्हाला पुन्हा कौल दिला. अपेक्षेपेक्षा काही जागा कमी आल्या असतील. मात्र त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पहिलीच पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेतच त्यांनी स्पष्ट केलं की सरकार स्थापनेचे सगळे मार्ग खुले आहेत. लोकांनी महायुतीला मतदान केलं होतं त्यामुळे हे वक्तव्य आमच्यासाठी धक्काच होतं. त्यांनी हे वक्तव्य का केलं असावं हा प्रश्न निश्चितपणे आमच्यासमोर आला. मी पहिल्याच पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे आभार मानले होते. गेले पंधऱा दिवस ज्या प्रकराची वक्तव्य या महाराष्ट्रात माध्यमांमधून आपल्याला पाहण्यास मिळाली ते दुर्दैवी आहे असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2019 4:50 pm

Web Title: never talk about cm for half term says devendra fadanvis scj 81
Next Stories
1 देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, राज्यपालांकडे केला सुपूर्द
2 शिवसेना आणि भाजपा यांच्यातला तिढा सुटण्याची चिन्हं-सूत्रं
3 ‘हा’ आमदार म्हणतोय, “मी फोनची वाट बघतोय पण कुणी फोन करतच नाही”
Just Now!
X