X
X

“…सगळी वाट लाऊन झाली आणि आता अंगाशी येणार कळल्यावर रुग्णालयात दाखल”

READ IN APP

निलेश राणे यांनी केली संजय राऊत यांच्यावर कठोर शब्दात टीका

राज्यात सध्या वेगवान घडामोडी घडत असून राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिलं होतं. मात्र, राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने न दिल्याने आता राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे सुरू असल्याचे दिसत आहे. शिवसेनेचा सरकारस्थापनेचा दावा जरी कायम असला तरी त्यांना देण्यात आलेली वेळ संपली आहे. शिवसेना दिलेल्या वेळेपर्यंत बहुमत सिद्ध करु शकलेली नाही. त्यामुळे राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ”आता नवीन नाटक… सगळी वाट लाऊन झाली आणि आता अंगाशी येणार कळल्यावर रुग्णालयात दाखल” झाले असल्याचं ट्विटद्वारे निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेच्या वेगवाग घडामोडी सुरू असतानाच, छातीत वेदना होत असल्याने आज सायंकाळी संजय राऊत लिलावती रुग्णालयात दाखल झाले. यानंतर त्यांना दोन दिवसांची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुढचे दोन दिवस संजय राऊत कुणालाही भेटणार नाहीत असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.

या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी, “आता नवीन नाटक… सगळी वाट लाऊन झाली आणि आता अंगाशी येणार कळल्यावर रुग्णालयात दाखल. संज्या अजून किती खालची पातळी गाठणार तू. उद्धवची आणि शिवसेनेची वाट लावून आता दोन दिवस कोणालाच भेटणार नाही म्हणतो. शिवसैनिकांनो आताच तुम्हीच करा ह्याचा बंदोबस्त.” असे ट्विट केले आहे.

 

या अगोदर त्यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत, “मला काल पासून वाटतंय येणाऱ्या काही दिवसांत शिवसैनिकच संज्या राऊतला धरून मजबूत चोपेल” तसेच “संज्या राऊत इतका गरीब आहे की मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद बघायला पवार साहेबांच्या घरी गेला. बाकी राहुदे त्याला अगोदर कोणी तरी TV आणि लाईट बिलचे पैसे द्या. आणि उध्दव ला कॅटबरी चॉकलेट द्या बिचाऱ्याला वाईट वाटलं की त्याला खोटारडा म्हटलं. शाळेत असल्यासारखा वाटलं त्याला बघून,” अशी ट्विटद्वारे टीका केली होती.राणे आणि ठाकरे कुटुंबामधील राजकीय वैर सर्वज्ञात असून दोघेही नेहमीच एकमेकांवर टीका करत असतात. तर शिवसेना नेते संजय राऊत निवडणूक निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवसापासून चर्चेत आहेत. मात्र, दोन ते तीन दिवसांपासून त्यांना छातीत वेदना होत होत्या. त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोन दिवसांपासून त्यांना हा त्रास जाणवत होता मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं असल्याचं सांगितलं जात आहे.

23
X