राज्यात गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे. केंद्राने दोन वर्षांसाठी महसूल माफ केला तर महाराष्ट्र कर्जमुक्त होईल, अशी मागणी उद्धव यांनी केली होती. यावरुनच भाजपाचे नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पोरकट म्हटलं आहेत. तसेच केंद्राकडे महसूल माफीची भीक कशाला मागता असा सवालही निलेश यांनी उपस्थित केला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांनी मागणी केली आहे. यासंदर्भातील माहिती त्यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली. “राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं मदत करायला हवी. विरोधी पक्षातील नेत्यांनीही यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी. राज्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आर्थिक साहाय्य करण्याची मागणी त्यांनी करावी,” असंही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले. मुख्यमंत्रीपदाचा पदभार घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉलही केला होता, असंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं.
“मुंबई केंद्राला ३६ ते ४० टक्के महसूली कर देते. उर्वरित महाराष्ट्र चार टक्के कर केंद्राला देतो. एकंदरित महाराष्ट्र ४० ते ४४ टक्के कर केंद्राला देतो. मात्र याबदल्यात केंद्र महाराष्ट्राला काय देतं हा मोठा प्रश्न आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे किमान दीड ते पावणे दोन लाख कोटी रुपये महसूल केंद्राला महाराष्ट्रातून जातो. हे कायद्यात बसतं की नाही मला ठाऊक नाही पण फक्त दोन वर्षांसाठी हा महसूल माफ केल्यास माझं राज्य कर्जातून बाहेर पडू शकतं,” असं मत उद्धव यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं होतं.
मात्र दोन वर्ष महसूल रद्द करण्याच्या मुद्द्यावरुन निलेश राणेंनी उद्धव यांना ट्विटवरुन टोला लगावला आहे. “काय पोरकट मुख्यमंत्री आहे. प्रत्येक राज्यातून जो महसूल जातो तो केंद्र सरकार परत वेग वेगळ्या मार्गाने राज्यातच पाठवतात. मागायचे असेल तर महाराष्ट्र ज्या प्रमाणात महसूल पाठवतो त्याच प्रमाणात राज्यात परत आला पाहिजे ही मागणी करा. भीक का मागताय??,” असं ट्विट निलेश यांनी केलं आहे.
काय पोरकट मुख्यमंत्री आहे. प्रत्येक राज्यातून जो महसूल जातो तो केंद्र सरकार परत वेग वेगळ्या मार्गाने राज्यातच पाठवतात. मागायचे असेल तर महाराष्ट्र ज्या प्रमाणात महसूल पाठवतो त्याच प्रमाणात राज्यात परत आला पाहिजे ही मागणी करा. भीक का मागताय?? https://t.co/VtKpyScUTL
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 2, 2019
फडणवीस म्हणाले, “२५ हजार रूपये हेक्टरी मदत द्या”
याच विषयावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी विधानसभेमध्ये हेक्टरी २५ हजार रूपये मदत देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. “राज्यात जो अवकाळी पाऊस झाला. त्यात शेतकऱ्यांचं, मासेमारी करणाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्यांना तात्काळ २५ हजार रूपये हेक्टरी मदत देण्यात यावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः तशी मागणी केली होती. ती आता त्यांनी त्वरेने पूर्ण करावी आणि बळीराजाला दिलासा द्यावा,” अशी मागणी फडणवीस यांनी केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 2, 2019 12:00 pm