राजकारणात कोणी कोणाचा फारकाळ मित्र किंवा शत्रू नसतो, हे खर असल्याची प्रचिती सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सर्वांनाच येत आहे. अशाचप्रकारे आतापर्यंत भाजपा व संघ परिवारावर कायम टीका करणाऱ्या नितेश राणे यांनी चक्क संघाच्या कार्यक्रमात स्वयंसेवकांबरोबर जमिनीवर बसून हजेरी लावल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नुकताच भाजपात प्रवेश केलेले नितेश राणे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीच्या उत्सवास हजेरी लावली होती. देवगडमधील जमसंड येथील संघाच्या संचलनात नितेश राणे यांनी भाग घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्याचे पाहायला मिळाले. राजकीय वर्तुळात देखील जोरदार चर्चा सुरू आहेत. विशेष म्हणजे नितेश राणे यांनी चक्क जमिनीवर बसून संघाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सोशल मीडियावर देखील नितेश राणे यांचा संघाच्या कार्यक्रमात बसलेला फोटो तुफान व्हायरल होत असून, त्यावर आता प्रतिक्रिया देखील येत आहेत. विजयादशमीनिमित्त दरवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने शस्त्रपूजन व संचलनाचा कार्यक्रम घेतला जातो. संघाच्या या कार्यक्रमांना स्वयंसेवकांसह भाजपातील दिग्गज नेत्यांपासून सामान्य कार्यकर्ते देखील आवर्जुन हजेरी लावत असतात. त्यात आता नव्यानेच भाजपावासी झालेल्या राजकीय नेत्यांचा देखील समावेश होताना दिसत आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र असलेले नितेश हे कणकवलीतून भाजपचे उमेदवार आहेत. राज्यात जरी युती असली तरी शिवसेना ही सुरूवातीसपासूनच राणेंच्या विरोधात असल्याने या मतदारसंघात शिवसेनकडूनही उमेदवार उभा करण्यात आलेला आहे. राणेंचा गट सोडून आलेल्या सतीश सावंत यांना नितेश राणे विरोधात सेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपाचे बंडखोर संदेश पारकर यांनी देखील उमेदवारी अर्ज माघारी घेत नितेश राणेंविरोधात शिवसेनेच्या उमेदवारास पाठिंबा दिला आहे.