माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका करत चार हाडांचा बीएमसी चोर कोकणात आला होता असा टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे यांची बुधवारी कणकवलीत प्रचारसभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मित्राच्या घरी चोर शिरल्याने भाजपाला सावध करायला आलो आहे अशा शब्दांत राणे यांच्या कुटुंबावर हल्ला केला होता. आमची लढाई भाजपाविरोधात नाही, तर या परिसरातील खुनशी प्रवृत्तीविरुद्ध आहे असंही यावेळी त्यांनी म्हटलं होतं.

निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं असून ट्विट केलं आहे. “चार हाडांचा BMC चोर आज कोकणात आला होता आणि परत गेला. बाकीचं लवकरच बोलू,” असं निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

या मतदारसंघात भाजपाने खासदार नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश यांना उमेदवारी दिल्यामुळे शिवसेनेने एके काळचे राणेसमर्थक सतीश सावंत यांना त्यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी कणकवलीत नितेश यांच्या प्रचारासाठी सभा घेतली, पण त्यांनी प्रतिस्पर्धी पक्ष किंवा उमेदवाराबद्दल चकार शब्द काढला नाही. या पार्श्वभूमीवर झालेल्या सेनेच्या सभेत मात्र सर्वच वक्त्यांनी राणेंवर यथेच्छ तोंडसुख घेतले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे –
युतीतील मित्र भाजपा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना सावध करण्यासाठी आपण येथे आलो असल्याचे भाषणाच्या सुरुवातीलाच स्पष्ट करून राणे यांचे नाव न घेता उद्धव म्हणाले, या माणसाने काँग्रेसची वाट लावली. स्वत:च्या पक्षाची वाट लावली आणि आता तो तुमच्याकडे आला आहे. रामायण काळात राक्षस आपले इप्सित साध्य करण्यासाठी मायावी रूप धारण करत असत. तसेच याचे आहे. मी अनुभवाचे बोल सांगत आहे. हा माणूस ‘मातोश्री’च्या मिठाला जागला नाही आणि आता आमच्या युतीमध्ये मिठाचा खडा टाकला आहे. इतिहासात काही चुका झाल्या. या चुकांपासून शिकायचे असते. भाजपनेही तसे शिकावे. अन्यथा माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. पण खुनशीपणाच्या विरोधातील आमची लढाई राहणार आहे. पाठीत वार करणाऱ्यांची ही औलाद आहे. या जिल्ह्य़ातील काही व्यक्ती अचानक गायब झाल्या. त्यांचा आजतागायत तपास लागलेला नाही. हा खुनशीपणा आम्ही सहन करू शकत नाही आणि या निवडणुकीत कोणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ती मोडून काढू, असाही इशारा उद्धव यांनी भाषणाच्या अखेरीस दिला.

राणे यांच्या विरोधात भाषणाचा मुख्य भर ठेवलेल्या ठाकरे यांनी, नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाला सेनेचा विरोध कायम असल्याचाही पुनरुच्चार केला. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही राणे हा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीखालचा बॉम्ब असल्याचा आरोप करत त्यांच्या चिरंजीवांना येथे उमेदवारी देऊन भाजपने एक जागा कमी केली, असा दावा केला.