शरद पवार यांचा सवाल; पक्षांतर केलेल्यांवर टीकास्त्र

निवडणुकीत आमच्या पुढे आव्हानच नाही असे मुख्यमंत्री सांगत आहेत. मग राज्यात पंतप्रधान आणि गृहमंत्री काय पर्यटनासाठी येत आहेत, की भंडारदरा पाहायला येत आहेत, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

विकासासाठी पक्षांतर केले असे सांगणारे ४० वर्षे काय गवत उपटत होते का, असा टोलाही त्यांनी नाव न घेता भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री मधुकर पिचड यांना लगावला. तसेच पक्षांतर करणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकविण्याचे आवाहनही त्यांनी केले.

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांच्या प्रचारासाठी येथील बाजार तळावर पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

पाच वर्षांत ज्यांना समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे, तसेच इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक करता आले नाही, ते मला विचारतात तुम्ही काय केले? ज्या किल्ल्यांमध्ये महाराजांची तलवार तळपली त्या किल्ल्यांमध्ये आता बार सुरू होणार, तेथे छम छम सुरू होणार. असा निर्णय घेणाऱ्यांना महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असे त्यांनी बजावले.

पंतप्रधान राज्यात नऊ  निवडणूक प्रचारसभा घेणार आहेत, तर गृहमंत्री अमित शहा वीस सभा घेणार आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यात ते जाणार आहेत, कारण निवडणुकीत जनता आपल्याला वेगळा रस्ता दाखविणार आहे हे त्यांना कळले आहे, असा टोला त्यांनी लगावला.

संकटे पाहून स्थलांतर

माजी मंत्री मधुकर पिचड व वैभव पिचड यांच्याबद्दल पवार काय बोलतात याबद्दल उत्सुकता होती. मात्र त्यांचे नाव न घेता पवार यांनी त्यांच्यावर टीका केली. गेली अनेक वर्षे बरोबर असणारे सहकारी सोडून गेले. लोकशाहीत प्रत्येकाला भूमिका घेण्याचा अधिकार आहे. मात्र पक्ष सोडल्यानंतर त्यांनी जे कारण सांगितले ते ऐकून गंमत वाटली. विकासासाठी पक्ष सोडला, मग ४० वर्षे काय गवत उपटले, असा सवाल त्यांनी केला.चौकशी करता विकास फक्त यांचाच झाला नाही, तर शेजारीही होत आहे आणि तोही आदिवासी कायद्याचे उल्लंघन करून असे आढळले. आज ना उद्या मोठे संकट येणार आहे हे पाहून हे पक्षांतर झाले, अशी टीका त्यांनी केली. पवार यांचा रोख पिचड यांच्या दुसऱ्या पत्नीच्या बोगस आदिवासी दाखल्यासंदर्भात होणाऱ्या आरोपांकडे होता.