राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला आलेल्या यशाची व निसटत्या मतांनी झालेल्या पराभवाची याचबरोबर मत विभागणीची आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीची माहिती सोनिया गांधी यांना आज देण्यात आली. या व्यतिरिक्त इतर विषयांवर त्यांच्याशी कोणतीही चर्चा करण्यात आली नसल्याचं महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. राज्यातील सत्तास्थापनेवरून सुरू असलेल्या जोरदार घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र काँग्रेसचे शिष्टमंडळ दिल्लीत सोनिया गांधींच्या निवासस्थानी गेले होते. यानंतर बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना या भेटीबाबत माहिती दिली. थोरात यांच्या यांनी दिलेल्या माहितीवरून शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसच्या पाठिंब्याबाबत अद्यापतरी कोणताही निर्णय झाला नसल्याचे दिसून येत आहे.

काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांच्याशी जवळपास अर्धा तास चर्चा केल्याची माहिती आहे. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममुळे काँग्रेसचे निवडणुकीत झालेल्या नुकसानाबद्दल देखील सोनिया गांधी यांना माहिती देण्यात आली असल्यचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. तर यावेळी शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याबाबत सोनिया गांधी यांनी परवानगी दिली का? या प्रश्नावर उत्तर देण्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी टाळले. त्यामुळे काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार का? हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित राहिला आहे. शिष्टमंडळात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा समावेश होता.

एकीकडे शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचा एक गट प्रयत्न करत असताना दुसरीकडे काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी याला विरोध दर्शवला आहे. काँग्रेस पक्ष हा सेक्युलर पक्ष आहे सर्वधर्मसमभाव मानणारा पक्ष आहे. काँग्रेसने शिवसेनेसोबत मुळीच जाऊ नये अशी भूमिका शिंदे यांनी घेतली आहे. जनमत मान्य करुन काँग्रेसने विरोधात बसावं असंही त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस हा सेक्युलर पक्ष आहे काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि शिवसेनेची विचारधारा या दोहोंमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे काँग्रेसने शिवसेनेसोबत जाऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे असं शिंदे यांनी म्हटलं आहे.