विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या नेते मंडळींच्या सभा अधिकच रंगात आल्याचे दिसत आहे. आरोप-प्रत्यारोपांमधील तीव्रता वाढत असल्याचेही दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचारसेभेद्वारे केंद्र सरकारवर जोरदार टीका केल्याचे दिसत आहे. नुकतीच जाहीर झालेल्या ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’च्या आकडेवारीत भारताच्या झालेल्या घसरणीवरून पवार यांनी, जो जगाला अन्नधान्य निर्यात करतो, त्या देशातील मुलांना खायला अन्न नाही, ही बातमी जागतिक पातळीवर आपल्याबद्दल छापून येते. एवढी बेईज्जत या लोकांच्या राजवटीत केली जाते, असे म्हणत पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. निफाड येथे उमेदवार दिलीप बनकर यांच्या प्रचारार्थ गुरूवारी जाहीर सभा पार पडली.

यावेळी शरद पवार यांनी, या जगात मुलांना अन्नाचा पुरवठा करण्यासंदर्भात जे देश आहेत, त्याच्यामध्ये भारतातील मुलांना सगळ्यात कमी अन्न मिळतं. आपल्यापेक्षा नेपाळ, बांग्लादेश आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा अन्नाचं प्रमाण मुलांना अधिक मिळतं. ही भारतासारख्या देशाला चांगली बातमी आहे का? असा संतप्त सवाल करत, जो अन्नधान्याची निर्यात जगात करतो, त्या देशातील मुलांना अन्न खायला मिळत नाही. ही बातमी जागतिक पातळीवर आपल्याबद्दल छापून येते एवढी बेईज्जत या लोकांच्या राजवटीत केली जाते, अशी खंत व्यक्त केली.

हे चित्र बदलायचे की नाही? अशी विचारणा करत आपण सत्तेवर असलेल्या सरकारला बदललं पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. शेतकऱ्यांची दैना झाली आहे, शेतकरी आत्महत्या देखील वाढल्या आहेत, कारखाने आजारी पडले आहेत, मंदीचे संकट आलेले आहे, लोकांची रोजीरोटी जाते आहे. आज अशी ही सगळी संकटं महाराष्ट्रात आली आहेत. या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढण्याची धमक भाजपामध्ये नाही, त्यामुळे यांना सत्तेपासून बाजुला करा आणि राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीच्या मित्र पक्षांच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहनही शरद पवार यांनी केले.