मुंबई : निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे ठाकरे घराण्यातील पहिले शिलेदार आदित्य ठाकरे हे उमेदवार असूनही वरळी मतदारसंघात जेमतेमच उत्साह बघायला मिळाला. लोकसभा निवडणुकीवेळी रांगा लावणाऱ्या उच्चभ्रू मतदारांनी पाठ फिरवल्याने आदित्य यांना लक्षणीय मताधिक्य मिळावे यासाठी शिवसेनेला चाळकरी, मध्यमवर्गीय यांना जास्तीत जास्त  बाहेर काढण्यासाठी जोर लावावा लागला.

वरळीचे विद्यमान आमदार सुनील शिंदे यांच्याऐवजी आदित्य ठाकरे यांची वरळीतून उमेदवारी जाहीर झाली. आदित्य यांची वाट सोपी करण्यासाठी या भागातील राष्ट्रवादीचे माजी आमदार सचिन अहिर यांना आधीच शिवसेनेत घेण्यात आले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यासमोर विरोधी पक्षातून तगडे आव्हान नव्हते. प्रश्न मताधिक्याचा होता. त्यामुळे विद्यमान आमदार सुनील शिंदे, सचिन अहिर आणि आशीष चेंबूरकर यांच्यावर आदित्यसाठी मतांची जुळणी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

मात्र, आदित्य ठाकरेंसारखा उमेदवार असूनही वरळीत फारसे उत्साहाने मतदान झाले नाही. आदित्य ठाकरे यांनी सकाळी-दुपारी वरळी मतदारसंघात ठिकठिकाणी मतदान केंद्र-शिवसेनेच्या शाखांवर जाऊन परिस्थितीचा अंदाज घेतला. त्यावेळी मतदानाचा फारसा उत्साह नाही याकडे माध्यमांनी लक्ष वेधले असता दुपारनंतर मतदान वाढेल, असे आदित्य यांनी नमूद केले.

आदित्य यांच्या उमेदवारीच्या रूपाने ठाकरे घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर वरळी मतदारसंघातील सर्व भागांत जाऊन मतदान वाढावे यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लावत होते.

वरळीच्या उच्चभ्र भागात दुपारी तीनपर्यंत अवघे २५ ते ३० टक्केच मतदान झाले होते. याबाबत स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता,  लोकसभा निवडणुकीत उच्चभ्रू मतदारांनी सकाळी मॉर्निग वॉकनंतर थेट मतदान केंद्राची वाट धरत रांगा लावल्याचे चित्र वरळीमध्ये दिसले होते. यावेळी मात्र टोलेजंग इमारतीमध्ये राहणाऱ्यांनी मतदानाकडे तशी पाठच फिरवल्याचे दिसते. त्यामुळेच वरळी नाका व इतर परिसरातील चाळी-मध्यमवर्गीय वस्त्यांमध्ये मतदारांना बाहेर काढण्यासाठी आणखी जोर लावला जात असल्याचे सांगण्यात आले. कनिष्ठ मध्यमवर्गीय गुजराती-मारवाडी सोडले तर एकंदर त्या समाजातील मतदारांनी लोकसभा निवडणुकीवेळी मोदींसाठी जो उत्साह दाखवला तो आता दिसत नाही, अशी कबुली सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिली.