विधानसभेच्या निकालानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ता वाटपाच्या ५०-५० सुत्रानुसार मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षांसाठी दावा सांगण्यात काहीच चुकीचे नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. शिवसेनेला सरकार चालवण्याचा अनुभव आहे त्यामुळे ही मागणी रास्त वाटते असंही पवार म्हणाले आहेत.

राज्यामध्ये युतीला २२० जागा मिळण्याची शक्यता युतीमधील नेत्यांनी वारंवार बोलून दाखवली होती. मात्र पवारांच्या प्रचारबळामुळे भाजपाला केवळ १०५ जागांवर विजय मिळवता आला. २०१४ साली भाजपाने १२२ जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेने ५६ जागांवर विजय मिळला आहे. त्यामुळेच सत्ता स्थापनेसाठी भाजपाला शिवसेनेची मदत घ्यावीच लागणार आहे. निकालाच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकारपरिषदेमध्ये ‘मी भाजपाच्या सर्व अडचणी ऐकून घेणार नाही’, असं मत व्यक्त करत ५०-५० सूत्रावर कायम राहण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. उद्धव यांच्या या मागणीशी आपण सहमत असल्याचे पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे. “१९९० च्या दशकातही शिवसेना-भाजपाने ५०-५० चे सूत्र वापरले होते. त्यांना सरकार चालवण्याचा अनुभव असल्याने त्यांनी अशा मागणीवर अडून राहण्यात काहीच चुकीचे नाही,” असं पवार म्हणाले. पवारांनी दिलेला हा संदर्भ १९९५-१९९९ काळात शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले होते तेव्हाचा आहे.

विधानसभेच्या निकालामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीने १०२ जागांवर विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने या निवडणुकीमध्ये प्रचाराकडे दूर्लक्ष करुनही त्यांनी अपेक्षेहून चांगली कामगिरी केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्थानिक पातळीवर एकत्र काम केल्याने हे निकाल समोर आल्याचे पवारांनी म्हटले आहे. “काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आमच्या सोबतीने काम केले. आमच्या योग्य संवाद होता. सोनिया गांधी यांनी सभा घेतल्या नसल्या तरी राहुल गांधींनी सभा घेतल्या होत्या. मी इथला स्थानिक नेता या नात्याने पुढाकार घेत आघाडीसाठी अनेक सभा घेतल्या होत्या,” असं पवारांनी सांगितली.

प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीमधून नेत्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्यावरुन केलेली टीका योग्य नव्हती असं पवारांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली टीकाही चुकीची होती असंही पवार म्हणाले. “मुख्यमंत्री हे प्रगल्भ नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या टीकेकडे मी फारसे लक्ष देत नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी केलेली वक्तव्य चुकीची होती. मला पद्मविभूषण पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. जर माझ्यामध्ये एवढ्या कमतरता असतील तर मला पुरस्कार का देण्यात आला?” असा सवाल पवारांनी उपस्थित केला.

२०१४ साली भाजपा आणि शिवसेना संयुक्तरित्या निवडणूक लढल्यानंतर भाजपाने १२२ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी भाजपासोबत जायचे की नाही याचा विचार शिवसेनेकडून सुरु असताना पवारांनी सरकारला बाहेरुन पाठिंबा दिला होता. ‘महाराष्ट्राला पुन्हा निवडणूक परवडणारी नाही,’ असं सांगत त्यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला होता. सध्या आम्ही शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही असंही पवारांनी स्पष्ट केलं. ‘शिवसेना आणि भाजपामध्ये युती असल्याने शिवसेना आमच्याकडे प्रस्ताव घेऊन येणार नाही,’ असं पवारांनी सांगितलं.