राज्यातील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निकालावर भाजापाचे नेते नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने भाजपा विरोधात निर्णय दिलेला नाही. न्यायालयाने केवळ मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे उद्याचा विश्वासदर्शक ठराव भाजपा सरकार जिंकणार आहे, असा त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच, शिवसेनेला संविधानाचं काही देणंघेणं नाही, त्यांच्या बोलण्याची दखल घेतली जाऊ नये, असं देखील यावेळी राणे यांनी सांगितले.

याचबरोबर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते, तर ते काँग्रेसबरोबर कधीच गेले नसते. तसेच, सोनिया गांधी देखील आपली विचारसरणी सोडून शिवसेनेसारख्या जातीवादी पक्षाबरोबर जातील, असं मला वाटत नाही. अजित पवार हे स्पष्टवक्ते असल्याने जे पूर्वी ठरलं होतं तेच ते आजही बोलत आहेत, असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने भाजपा विरोधात निर्णय दिलेला नाही. विश्वासदर्शक ठरावासंबंधी न्यायालयाने मार्गदर्शन केलं आहे. हा निर्णय म्हणजे शिवसेनेच्या बाजूने होत नाही, संजय राऊत काहीही बोलत आहेत. आनंद साजरा करा पण कायम विरोधी पक्षात राहूनच आनंद साजरा करा. न्यायालयाने दिलेला निर्णय हा भाजपाचा पराभव नाही. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. उद्या सायंकाळी पाच नंतर विश्वासदर्शक ठरावावर जे मतदान होईल, त्यात भाजपाचे सरकार विजयी होणार अस जाहीर होईल, असा मला विश्वास आहे. राष्ट्रवादीकडून प्रयत्न जरी सुरू असले तरी, अजित पवार त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व पालन करणे आपलं काम आहे. आमचा पक्ष आणि आमचे मुख्यमंत्री यांना पूर्ण आत्मविश्वास आहे की, आपण उद्या जिंकणारचं. विरोधकांपैकी शिवसेनेला संविधानाचं काही देणंघेणं नाही. त्यांना नियम किंवा संसदीय परंपरा आपली घटना याचं काहीच देणंघेणं नाही. तोंडाला येईल ते मनात येईल ते बोलत जातात, त्यामुळे मला वाटतं की त्यांच्या बोलण्याची दखल घेतली जाऊ नये, असं राणे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे.

याचबरोबर काल महाविकास आघाडीच्या आमदारांनी घेतलेल्या सामूहिक शपथेच्या व आज जाहीर करण्यात आलेल्या आमदारांच्या स्वाक्षरी पत्राच्या पार्श्वभूमीवर बोलताना राणे यांनी सांगितले की, तस तर आम्ही २०० आमदारांच्या याद्या देखील देऊ शकतो. जर त्यांच्याकडे १६२ आमदार होते मग जेव्हा राज्यपालांनी त्यांना बोलावलं तेव्हा ते १६२ आमदार घेऊन का गेले नाहीत? किमान १४५ आमदार तरी त्यांनी न्यायला हवे होते. पण जर तेव्हा १४५ नव्हेत तर आज १६२ आमदार कुठून आणले? हा सगळा दिखावा आहे. नसलेली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा प्रत्यय उद्या येईल, असेही ते म्हणाले.