27 May 2020

News Flash

राज्यात एक कोटी तरुण मतदार

लोकसभा निवडणुकीनंतर १५ लाख मतदार वाढले

लोकसभा निवडणुकीनंतर १५ लाख मतदार वाढले

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी १५ लाख मतदारांची भर पडली असून या वेळी ८ कोटी ९९ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत तब्बल एक कोटी तरुण मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

एप्रिल-मेदरम्यान पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात ४ कोटी ६३ लाख १६ हजार पुरुष तर ४ कोटी २२ लाख ४५ हजार स्त्रिया असे ८ कोटी ८५ लाख ६४ हजार मतदार होते. त्यानंतर राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानाला प्रतिसाद दिल्याने या निवडणुकीसाठी ४ ऑक्टोबरअखेर ८ कोटी ९९ लाख ३६ हजार २६१ मतदारांची नोंदणी झाली आहे. राज्यात १८ ते २५ वयोगटातील  एक कोटी सहा लाख ७६ हजार १३ तरुण मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये ६० लाख ९३ हजार ५१८ युवक तर ४५ लाख ८१ हजार ८८४ युवती आहेत. या नोंदणीत एकूण ५ हजार ५६० अनिवासी भारतीयांची नोंद झाली असून यामध्ये ४ हजार ५४ पुरुष तर एक हजार ५०६ अनिवासी भारतीय महिलांची नोंद झाली आहे. तर २६३४ तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे.

या निवडणुकीसाठी एकूण ९६ हजार ६६१ मतदान केंद्रे निर्धारित करण्यात आली असून सर्वाधिक ७ हजार ९१५ मतदान केंद्रे पुणे जिल्ह्यात तर सर्वात कमी ९१६ मतदान केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आहेत. पुणे जिल्ह्य़ात सर्वाधिक ७७ लाख २९ हजार २१७ मतदार असून त्याखालोखाल ७२ लाख ६३ हजार मतदार मुंबई उपनगरांत तर ६३ लाख ९२ हजार मतदार ठाणे जिल्ह्यात आहेत. सर्वात कमी ६ लाख ७० हजार मतदार सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात असल्याची माहिती निवडणूक आयोगातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.

आढाव्यासाठी आयोगाचा दौरा

विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह आणि अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह उद्यापासून राज्यातील विविध जिल्ह्य़ांचा दौरा करणार असून यादरम्यान मतदान तयारीचा आढावा तसेच कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2019 2:32 am

Web Title: one crore young voters in the maharashtra zws 70
Next Stories
1 प्रदूषणकारी कारखान्यांवर बडगा?
2 शिवसेनेच्या प्रचारासाठी भाजपला आदेशाची प्रतीक्षा
3 ‘सीएनजी’साठी ४० किलोमीटरचा फेरा
Just Now!
X