नुकत्याच जाहीर झालेल्या हंगर इंडेक्सनुसार भारतातील मुलांना योग्य, पोषक अन्न मिळत नाही. जो देश अन्नधान्य निर्यात करतो, त्याच देशात मुलांना खायला अन्न नाही, ही बातमी जागतिक पातळीवर आपल्याबद्दल छापून येते. भारतापेक्षा नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान येथील मुलांना जास्त अन्न मिळतं ही बाब भारतासाठी लाजिरवाणी आहे, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केली. निफाड येथील जाहीर सभेत ते बोलत होते. नुकत्याच जाहीर झालेल्या हंगर इंडेक्सच्या अहवालावर बोलताना शरद पवार यांनी ही टीका केली.

“जगात मुलांना अन्नाचा पुरवठा करण्यासंदर्भात जे देश आहेत, त्यामध्ये भारतातील मुलांना सगळ्यात कमी प्रतीचे अन्न मिळते. आपल्यापेक्षा नेपाळ, बांग्लादेश आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा अन्नाचे प्रमाण मुलांना अधिक मिळते, ही भारतासारख्या विकसनशील देशासाठी चांगली बातमी आहे का?” असा सवाल पवार यांनी केला.

“जो अन्नधान्याची निर्यात जगात करतो, त्या देशातील मुलांना अन्न खायला मिळत नाही. अशी बातमी जागतिक पातळीवर आपल्याबद्दल छापून येणे हे फारच लाजिरवाणे आहे. हे चित्र बदलायचे असेल तर आपण सत्तेवर असलेल्या सरकारला बदलले पाहिजे. शेतकऱ्यांची दैना झाली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. कारखाने आजारी पडले आहेत. मंदीचे संकट आलेले आहे. लोक बेरोजगार होत आहेत. आज ही सगळी संकटे महाराष्ट्रात आली आहेत. त्या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढण्याची धमक भाजपमध्ये नाही. त्यामुळे यांना सत्तेपासून बाजूला करणं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले.