हर्षद कशाळकर

रायगड जिल्ह्यात विधानसभेच्या सात जागांसाठी येत्या २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. ही निवडणूक जरी रायगड जिल्ह्यात होणार असली तरी निवडणूकीचा प्रचार मात्र मुंबईत सुरु झाला आहे. मुंबईकर चाकरमान्यांना मतांसाठी पायघड्या घाल्यण्याचे प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांनी सुरु केले आहेत. मुंबईत बठका घेऊन मुंबईकर मतदारांना साकडे घातले.

रायगड जिल्ह्यातील हजारो मतदार कामा निमित्ताने मुंबईत स्थायिक आहेत. या मुंबईकर मतदारांवर सर्वच राजकीय पक्षांचा डोळा आहे. त्यामुळे निवडणूक प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात मतदार संघात मुंबईकरांना गाठण्याचे प्रयत्न राजकीय पक्षांनी सुरु केले आहेत. शिवसेनेपाठोपाठ शेकापनेही विभागवार बठकांचे आयोजन सुरु केले आहे. मुंबईत स्थायिक असणाऱ्या मतदारांना एकत्र करून मतदानासाठी येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

कोकणातील अनेक गावांमध्ये गावपंचायती कार्यरत आहेत. या गावपंचायती मार्फत आजही गावाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय व्यवस्था संभाळली जाते. यात गावागावातील मुंबईकर मंडळं महत्वाची भुमिका बजावत असतात. गावाला आर्थिक पाठबळ देण्यात त्यांच्या मोठा सहभाग असतो. त्यामुळे मुंबईकर मंडळांना गावात महत्वाचे स्थान असते. ही बाब लक्षात घेऊन मुंबईकर मंडळांना आणि मतदारांना चुचकारण्याचे प्रयत्न राजकीय पक्षांनी सुरु केले आहेत.

मुंबईत जाऊन गावमंडळांना गाठून त्यांच्या एकत्रीत बठका घेणे, छोटे खानी सभा घेऊन त्यांना मतदानासाठी साकडे घालणे, त्यांची येण्या जाण्याची व्यवस्था लावून देणे यासारखे नियोजन सुरु झाले आहे. शिवसेनेनी सुरवातीला मुंबईत गावमंडळांच्या बठका घेतल्या. यानंतर शेकापनेही मुंबईत जाऊन निवडणूक प्रचाराला सुरवात केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणूकीत हाच फंडा प्रचारासाठी वापरला होता. मुंबई, सह सुरत आणि बडोदा येथे कामासाठी स्थायिक झालेल्या रायगडच्या मतदारांना गाठले होते. तिथे जाऊन हळदी कुंकू समारंभ केला होता.

मतदानासाठी सर्वाना बोलवून घेतले होते. हाच फंडा आता विधानसभा निवडणूकीत सर्वच राजकीय पक्षांकडून वापरला जात असल्याचे दिसून येत आहे.