सावरगावमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही पंकजा मुंडे यांनी दसऱ्यानिमित्त मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाहही उपस्थित होते. या मेळाव्यात पंकजा मुंडे आणि अमित शाह यांच्या भाषणामध्ये शेतकरी आत्महत्या, पाणी प्रश्न यासारख्या स्थानिक मुद्द्यांऐवजी देशभक्ती आणि कलम ३७० च्या मुद्द्यांवर भर दिला. अनेकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली असून महाराष्ट्रातील निवडणुकीचा काश्मीर आणि कलम ३७० शी काय संबंध असा सवाल ट्विटवर उपस्थित केला जात आहे.

अमित शाह यांनी आपल्या भाषणामध्ये, ‘पंतप्रधान मोदींना पूर्ण बहुमत दिल्यानंतर पाच महिन्यांमध्ये सरकारने कलम ३७० रद्द केले. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे तुम्हाला मान्य आहे की नाही. कलम ३७० रद्द करण्याला विरोध करणाऱ्यांना तुम्ही निवडून देणार का?’ असा सवाल उपस्थितांना आपल्या भाषणामधून केला. तर दुसरीकडे पंकजा यांनाही आपल्या भाषणातून राष्ट्रभक्ती या विषयावर जोर दिल्याचे पहायला मिळाले. ‘आपल्या देशात राष्ट्रभक्तीचं केवळ सर्वांना एकत्र बांधू शकते. कलम ३७० च्या माध्यमातून राष्ट्रभक्ती दिसून आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी कलम ३७० हटवून न्याय मिळवून दिला. अमित शाह यांच्या नेतृत्वात सीमोल्लंघन करायचं आहे. सामान्यांसाठी वंचितांसाठी गोपीनाथ मुंडे यांनी जी लढाई दिली ते काम आता सुरू झालं आहे. उमेदवारी अर्ज भरताना मी पंतप्रधान मोदींचा आशीर्वाद घेतला. तेव्हा ते मला खुश राहा म्हणाले. त्यावेळी मला समजलं की मतांपेक्षा लोकांच्या मनावर राज्य करणं आवश्यक आहे’, असं पंकजा आपल्या भाषणामध्ये म्हणाल्या.

दरम्यान या सभेसाठी आलेल्या शाह यांचे स्वागत ३७० तोफांची सलामी देत ३७० राष्ट्रध्वज फडकवत करण्यात आले. महाराष्ट्रातील सभेमध्ये काश्मीरच्या मुद्द्यावर भर देण्याचा भाजपाचा प्रयत्न चुकीचा असल्याचे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

 

दरम्यान, या भाषणामध्ये स्थानिक स्तरावरील एकाही प्रश्नावर कोणत्याच नेत्याने भाष्य न केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अमित शाह यांनी आपले भाषण राजकीय मंचावरुन नसल्याचे सांगत पंकजा यांना शुभेच्छा देत भाषण संपवले.