विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुती जवळपास २२५ जागा जिंकेल असा विश्वास पीयूष गोयल यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत सकाळी मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना हे भाकीत केलं.

गोयल म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात तर मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली हरयाणात पुन्हा सरकार स्थापन होईल. महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना महायुतीला जवळपास २२५ जागा मिळतील असा मला विश्वास वाटतो. महाराष्ट्रातील जनता मोदी आणि फडणवीस यांच्यासोबत आहे. तसेच हरयाणात आम्ही ७५ पेक्षा अधिक जागांच टार्गेट पूर्ण करु, असा विश्वासही त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. विरोधकांनी त्यांचा संपूर्ण विश्वास गमावला असून त्यांचा या निवडणुकीत पराभव होईल, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्रात २८८ जागांसाठी तर हरयाणात ९० जागांसाठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे. महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन्ही राज्यांत मिळून एकूण ४४०० उमेदवार विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. यांपैकी महाराष्ट्रात ३२३७ उमेदवार तर हरयाणात ११६९ उमेदवार आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात ९६,६६१ मतदार केंद्रे तर हरयाणात १९,५७८ इतकी मतदान केंद्रे मतदानासाठी सज्ज आहेत.