|| संतोष सावंत

गेल्याच आठवडय़ात समुद्रकिनारी साचलेला प्लास्टिक कचरा उचलताना पंतप्रधान मोदी भारतवासीयांना प्लास्टिक टाळण्याचा संदेश दिला. परंतु खारघर येथे बुधवारी झालेल्या प्रचार सभास्थळी आलेल्या कार्यकर्त्यांनी मात्र प्लास्टिक बाटल्या आणून इतरत्र फेकून दिल्याने पंतप्रधानांचा संदेश पायदळी तुडवला.

मंडपात आत जाण्यापूर्वी पाण्याची बाटली, तंबाखूपुडी, काळ्या, पिवळ्या व गडद निळ्या रंगाचे कापड परिधान केलेल्या स्त्री-पुरुषांना मंडपात प्रवेश निषिद्ध होता. आयोजकांनी त्यांना पुन्हा आलेल्या वाहनात बसण्याचे आवाहन केले. सुमारे २५ हजार कार्यकर्ते एकाच छताखाली बसतील अशी सोय करण्यात आली होती.

मात्र जे मोदी मागच्या आठवडय़ात प्लास्टीक बाटल्या समुद्रकिनारी उचलत होते, त्यांची जयजयकार करणारे कार्यकर्ते पाणी पिऊन त्या रिकामी प्लास्टीक बाटल्या तेथेच फेकून देत होते. येथे कचरा करू नये असा कोणताही स्वच्छतेचा फलक जनजागृती करणाऱ्या सिडको आणि पनवेल महापालिका उभारण्यास विसरली असावी, असे काहीवेळ वाटले.

मोदीमंडपात जाण्यापूर्वी प्रत्येक प्रवेशकर्त्यांची अंगझडती घेण्यात आली. ऐन उन्हात सभा आयोजन केल्याने अनेक जण डोक्यात टोपी घालून आले होते. मात्र अनेकांची टोपी पोलिसांना न आवडणाऱ्या रंगाची असल्याने त्यांनी ती जप्त करूनच प्रवेशकर्त्यांना प्रवेश दिला. अंगझडती म्हणजे संपूर्ण अंगझडती, त्यामध्ये पायातील बूट काढून दाखविण्याचे सांगण्यात आले. काळ्या रंगाची साडी नेसून आल्याने मायक्का सोनावणे या मोदींच्या खास कार्यकर्त्यां महिलेला पोलिसांनी प्रवेशद्वारावरून पिटाळले. मायक्कांसारख्या अनेक जणी मोदींचे भाषण एक किलोमीटर उभ्या केलेल्या वाहनात बसून किंवा रस्त्यावर बसून ऐकत होत्या.

पत्रकारांना व पक्षांच्या व्हीआयपी कार्यकर्त्यांना बसण्यासाठी अगोदरच पास दिल्याने सुरक्षित म्हणजेच मोदीमंडपापासून सुमारे सहाशे मीटर अंतरावर पोलिसांच्या बंदोबस्तात बसण्याची सोय करण्यात आली होती.

कार्यकर्त्यांमध्ये अनेक पोलीस साध्या वेशात बसले होते. पोलिसांच्या कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे मोबाइल, अंगावरचे कपडे आणि पेन, वही, डोक्यात मोदी भगवे फेटे, गळ्यात कमळछाप शेले अशा वस्तूंना आणण्यास बंदी नव्हती. मोदीमंडपाच्या व्यासपीठावर निवेदकांची जागा

पनवेलच्या प्रथम नागरिक डॉ. कविता चौतमोल यांनी घेतली होती. तर विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर हे अधूनमधून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी भारत माता की जय अशा नारा देऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वारे भरण्याचा प्रयत्न करीत होते.

कर्करुग्णांना फटका

मोदी सभेमुळे सुरक्षेचे कडे खारघरच्या सेंट्रल पार्क ते टाटा रुग्णालयापर्यंत पोलिसांनी उभे केले होते. पंतप्रधानांच्या सुरक्षित कोणतीच ढिलाई राहू नये, म्हणून कोणत्याही वाहनाला आणि व्यक्तीला या मार्गाने जाण्यास मज्जाव होता. मात्र याचा सर्वात मोठा फटका टाटा रुग्णालयातील कर्करुग्णांना बसला. पोलिसांच्या बंदोबस्तामुळे अनेकांना पायपीट करत रुग्णालयापर्यंत जावे लागले.