जालन्यातील परतूर विधानसभा मतदार संघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची बुधवारी सभा पार पडली. यासभेमध्ये पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये किती जागा मिळतील याचे भाकीत वर्तवले.

‘२०१४ पर्यंत योजना मराठवाड्यासाठी बनायच्या, नावं मराठवाड्याच्या लोकांचे घेतले जायचे. मात्र विकास मराठवाड्याचा झाला नाही तर केवळ काही नेत्यांचा, त्यांच्या कुटुंबाचा, नातेवाईकांच्या आणि जवळच्या लोकांचा विकास झाला. अशापद्धतीचे राजकारण आता थांबवायला हवे. मराठवाड्यामध्ये रस्ते, पाणी, रुग्णालयेसाराख्या मूलभूत गरजाही पूर्ण होऊ शकल्या नाहीत. मूलभूत सुविधांसाठी येथील जनतेला संघर्ष करावा लागला. या भागातील काँग्रेसच्या नेत्यांना तीन वेळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला. मात्र या तिघांच्या कार्यकाळात झालेली विकास कामे आणि भाजपाच्या एका मुख्यमंत्र्याच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांची तुलना केली तर भाजपा सरस ठरेल. या निवडणुकीमध्ये काय होणार आहे मला ठाऊक आहे. राष्ट्रवादीचे निशाण असणारे घड्याळ आहे ना त्यात एक छोटा काटा दहावर आहे आणि दुसरा मोठा काटा दहावर आहे. तशाच प्रकारे राज्यात काँग्रेसला दहा जगा आणि राष्ट्रवादीला दहा जागा मिळतील. त्यांच्या घड्याळानेच हे दाखवले आहे. दोन्ही पक्ष दहाच्या पुढे जाण्याची शक्यता नाही,’ असा टोला मोदींनी आपल्या भाषणामध्ये लगावला आहे.

तुम्ही चुकीच्या मुद्द्यांवरुन राजकारण करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुपडा साफ करा असं आवाहनही मोदींनी यावेळी मतदारांना केलं. “विरोधी पक्ष चुकीच्या पद्धतीचं राजकारण करतात म्हणूनच आज मोठा जनाधार असणारे त्यांच्या पक्षातील अनेक नेते महायुतीमध्ये आले आहेत. इतकचं नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते मतदानाच्या दिवशी मतदानकेंद्रावर जाऊन महायुतीलाच मतदान करतील,’ असा विश्वासही या वेळी बोलताना मोदींनी व्यक्त केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अनेक वर्ष केंद्र आणि राज्यात सत्ता केली. मात्र त्यांची नियत कधीच साफ नव्हती असंही मोदी आपल्या भाषणामध्ये म्हणाले.

मोदींनी जवळजवळ ४० मिनिटे भाषण केले.