पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका

अकोला : देशातील जवानांबरोबर महाराष्ट्राच्या जवानांनीही काश्मीरच्या संरक्षणासाठी बलिदान दिले. महाराष्ट्राच्या या वीर सुपुत्रांचा आम्हाला गर्व आहे. स्वार्थासाठी राजकारण करणारे महाराष्ट्राचा काश्मीरशी संबंध काय, असे विचारण्याची हिंमत करतात. असा निर्लज्ज सवाल करताना काँग्रेसला लाज वाटली पाहिजे. असा प्रश्न विचारणाऱ्यांनो, ‘डूब मरो’, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर घणाघाती टीका केली.

पश्चिम विदर्भातील महायुतीच्या उमेदवारांसाठी बुधवारी अकोल्यात पंतप्रधानांची सभा झाली. पंतप्रधान म्हणाले की, अनुच्छेद ३७० रद्द केले हे विरोधकांना मंजूर नाही. त्यांना एकमेकांमध्ये लढणारा देश अपेक्षित आहे. महाआघाडीच्या मतपेढीच्या राजकारणामुळे मुंबईसह महाराष्ट्राचे नुकसान झाले. दहशतवाद व बॉम्बस्फोट यासारख्या घटना नित्याच्या होत्या.

कोणाकोणाचे कसे संबंध होते, हे आता समोर येत आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विकासाचा संकल्प हाती घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडून राष्ट्रासाठी सर्वस्व त्याग करण्याची प्रेरणा मिळाली. स्वराज्यला सुराज्यामध्ये बदलण्याची निष्ठा लोकमान्य टिळकांच्या विचारातून प्राप्त झाली. सामाजिक न्यायाला निरंतर मजबूत करण्याची ज्योतिबा फुलेंची शिकवण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति असलेल्या आस्थेमुळेच ‘सबका साथ, सबका विकास’ आणि ‘सबका विश्वास’ याला नव्या भारताचा मूलमंत्र बनवले. वीर सावरकरांच्या संस्कारातूनच राष्ट्रवादाला राष्ट्रनिर्माणाचे मूळ ठेवले. आंबेडकर, सावरकरांचा वारंवार अवमान करणारे आहेत असा आरोपही मोदींनी केला.

जलयुक्त शिवार व सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य झाल्याचे सांगत मोदींनी फडणवीसांचे कौतुक केले.

काँग्रेस-राष्ट्रवादी ही भ्रष्टवादी आघाडी

गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपने कोणता पक्ष पारदर्शक कारभार करून राज्याचा विकास करू शकतो हे दाखवले. यापूर्वीच्या आघाडी सरकारने आपले व आपल्या परिवाराचेच कल्याण केले. काँग्रेस-राष्ट्रवादी ही भ्रष्टवादी आघाडी असून, त्यांनी महाराष्ट्राला अनेक वर्षे मागे लोटले, अशी टीका मोदींनी केली.  तपास यंत्रणा, केंद्र शासन व अधिकाऱ्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र विरोधकांनी आखले. मात्र, आता वेळ बदलली, या लोकांवर लक्ष आहे, असा इशारा मोदींनी दिला.