पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेची समारोप सभा नाशिकमधील पंचवटीतील तपोवनात पार पडली. या सभेमध्ये भाजपाचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यामध्ये यामध्ये महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, रामदास आठवले, गिरिश महाजन, उदयनराजे भोसले यांच्याबरोबरच भाजपाचे राज्यातील सर्वच प्रमुख नेत्यांचा सहभाग होता. पंतप्रधान मोदी दीडच्या सुमारास दाखल झाले. मोदींनी या सभेत आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमधून केली तर मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा बराचसा भाग हिंदीत होता.

दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पंचवटीतील तपोवनातील सभेच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्याचे आगमन झाले. त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले भाषण करत होते. मोदी दाखल झाल्यानंतर सर्वात आधी चंद्राकात पाटील यांनी भाषण केले. पाटील यांनी आपल्या भाषणात अनेकदा हिंदीचा वापर केला. पाटील यांनी आपले भाषण आटोपते घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषण केले. या भाषणातील अनेक मुद्दे त्यांनी हिंदीमध्ये स्पष्ट केले. फडणवीस यांनी आपल्या भाषणामधून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांच्यावर टीका केली. तसेच त्यांनी पाच वर्षाच्या कार्यकाळात काय काय कामे केली आहेत याची थोडक्यात माहिती दिली. यावेळी पंतप्रधान मोदी मंचावर उपस्थित होते. फडणवीस यांच्या अंदाजे दहा मिनिटांच्या भाषणामधील बराचसा भाग हा हिंदीत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी फडणवीस यांनी बरेच मुद्दे हिंदीमधून मांडल्याचे चित्र दिसले.

सव्वा दोनच्या सुमार पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. ‘प्रभू श्री राम आणि सीता मातेच्या चरणस्पर्शाने पावन आणि आदिमाया आदिशक्ती महिषासुर मर्दिनी सप्तश्रृंगी मातेच्या निवासाने पवित्र अशा नाशिकाच्या या पावन धर्मभूमीला माझा शत: शत: नमस्कार,’ अशी मराठमोळी सुरुवात मोदींनी आपल्या भाषणाला केली. भाषणामध्ये मोदींनी फडणवीस यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करताना फडणवीस हे ऊर्जावान मुख्यमंत्री असल्याचे मत व्यक्त केले. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे यांनी माझ्या डोक्यावर एक छत्र ठेवलं आहे. हा माझा सन्मान आहे,’ अशी भावना मोदींनी व्यक्त केली. ‘मी देवेंद्र फडणवीस यांना नमन करण्यासाठी आलो आहे. चार हजार किमीच्या यात्रेत कोट्यवधी लोकांनी आशीर्वाद दिला आहे. देवेंद्र फडणीस यांनी महाराष्ट्राला एक नवी दिशा दिली आहे. आता महाराष्ट्राला पुन्हा स्थिर राजकारणाची संधी आहे. महाराष्ट्र आणि गुजरात कधी काळी एकाच ताटात जेवायचे. गुजरातमध्ये सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री म्हणून सेवा करण्याची संधी मला दिली. जो फायदा देवेंद्र फडणवीस यांना मिळाला आहे तो कधीकाळी मला मिळाला होता,’ अशा शब्दांमध्ये त्यांनी फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले.

दरम्यान मोदींच्या आगमनाआधी पंकजा मुंडे यांनी भाषण केले. मात्र त्यांनी संपूर्ण भाषण मराठीमधून केले. मुंडे यांनाही भाषणामधून काँग्रेस, राष्ट्रवादीवर निशाणा साधला. ‘राज्याला राष्ट्रवादी काँग्रेस मुक्त करण्याचं स्वप्न आहे. भाजप हा जातीपातीला थारा न देणारा पक्ष आहे’ अस मुंडे यांनी आपल्या भाषणात म्हटले. एकीकडे मोदींनी मराठीमधून भाषणाला सुरुवात करताना मुख्यमंत्र्यांनी हिंदीतून केलेले भाषण अनेकांना खटकल्याचे सोशल मिडियावर दिसून आले.