अयोध्या राम मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून न्यायालयावर विश्वास ठेवणं गरजेचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. “गेल्या काही दिवसांपासून राम मंदिरासंबंधी वक्तव्य केली जात आहेत. देशातील सर्व नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान करणं आवश्यक आहे. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना वक्तव्य करणारे कुठून येत आहेत. सर्व प्रकरणात अडथळा का आणला जात आहे ?. आपला सर्वोच्च न्यायालय, राज्यघटनेवर, न्याय प्रक्रियेवर विश्वास असला पाहिजे. राम मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवा, हात जोडून मी तुम्हाला विनंती करतो.” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आयोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावली . नरेंद्र मोदींच्या सभेनिमित्त भाजपाचे दिग्गज नेते नाशिकमध्ये उपस्थित होते. यावेळी नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना संधी देण्याचं आवाहन केलं.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही नरेंद्र मोदी यांनी टीका केली. मतांसाठी शरद पवारांकडून काश्मीर मुद्द्यावर अपप्रचार केलं जाणं दुर्देवी असल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. “काँग्रेस गोंधळलं आहे हे समजू शकतो. पण शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेता काही मतांसाठी चुकीचं विधान करत असेल तर फार दुख होतं. शरद पवारांना शेजारी देश चांगला वाटतो. ही त्यांची इच्छा. तेथील नेते त्यांना कल्याणकारी वाटतात. पण हे संपूर्ण देशाला माहिती आहे की, दहशतवाद्यांची फॅक्टरी कुठे आहे ? हिंसाचार शोषण झाल्याचे फोटो कुठून येतात ?,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

दरम्यान नरेंद्र मोदी यांच्या पंचवटीतील तपोवनात होत असलेल्या जाहीर सभेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेस बाधा पोहचू नये, यासाठी गुरुवारी सर्व मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्यात आली. तसंच कांद्याच्या कोंडीने शेतकरी वर्गात संताप खदखदत असून त्याचा भडका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत उडू नये आणि कांदा हे निषेधाचे हत्यार ठरू नये यासाठी या सभेत कांदा वा अन्य शेतमालाशी संबंधित वस्तूच नव्हे, तर पिशव्यादेखील आणण्यास मनाई करण्यात आली.

Live Blog

15:07 (IST)19 Sep 2019
चला आणूया पुन्हा आपले सरकार - नरेंद्र मोदी

चला आणूया पुन्हा आपले सरकार, नरेंद्र मोदींचा नाशिकच्या सभेत नारा

15:06 (IST)19 Sep 2019
राम मंदिर प्रकऱणी सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवा - नरेंद्र मोदी

गेल्या काही दिवसांपासून राम मंदिरासंबंधी वक्तव्य केली जात आहेत. देशातील सर्व नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान करणं आवश्यक आहे. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना वक्तव्य करणारे कुठून येत आहेत. सर्व प्रकरणात अडथळा का आणला जात आहे ?. आपला सर्वोच्च न्यायालय, राज्यघटनेवर, न्याय प्रक्रियेवर विश्वास असला पाहिजे. राम मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवा, हात जोडून मी तुम्हाला विनंती करतो.

14:57 (IST)19 Sep 2019
नरेंद्र मोदींकडून जलयुक्त शिवार योजनचं कौतुक

एकदा महाराष्ट्रात पाण्याची समस्या मिटली तर कोणीही प्रगती रोखू शकत नाही - नरेंद्र मोदी

14:56 (IST)19 Sep 2019
14:55 (IST)19 Sep 2019
शरद पवारांना शेजारी देश चांगला वाटतो - नरेंद्र मोदी

शरद पवारांना शेजारी देश चांगला वाटतो. ही त्यांची इच्छा. तेथील प्रशासन त्यांना कल्याणकारी वाटतात. पण हे संपूर्ण देशाला माहिती आहे की, दहशतवाद्यांची फॅक्टरी कुठे आहे ? हिंसाचार शोषण झाल्याचे फोटो कुठून येतात ?

14:52 (IST)19 Sep 2019
जम्मू काश्मीरच्या निर्णायवर विरोधकांनी राजकारण करणं दुर्दैवी - नरेंद्र मोदी

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जे सहकार्य करायला हवं होतं ते दिसत नाही. विरोधक म्हणून त्यांनी सरकार, माझ्यावर टीका करणं त्यांचा हक्क. पण राष्ट्रहिताच्या बाबतीत असं बोलणं जे शत्रुंसाठी फायद्याचं होईल, त्यावरुन भारतावर टीका होणं दुर्दैवी आहे. अशा लोकांना ओळखणं गरजेचं आहे. काँग्रेस गोंधळलं आहे हे समजू शकतो. पण शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेता काही मतांसाठी चुकीचं विधान करत असेल तर फार दुख होतं.

14:49 (IST)19 Sep 2019
काश्मीरची सर्व समस्यांमधून सुटका करणं देशवासियांचं काम - नरेंद्र मोदी

जम्मू काश्मीरमध्ये हिंसा भडकावण्याचा प्रयत्न होत आहे. पण तेथील तरुण, महिला हिंसेतून बाहेर पडण्याची तयारी केली आहे. रोजगाराची संधी त्यांना हवी आहे. तुमचं हे सरकार तुम्हा सर्वांना सोबत घेऊन विकासाचं नवं युग सुरु कऱण्यास कटिबद्ध आहोत.

14:47 (IST)19 Sep 2019
काश्मीरला स्वर्ग करण्याचा १३० कोटी जनतेचा संकल्प आहे - नरेंद्र मोदी

ज्या धर्तीवर रक्त सांडण्यात आलं त्या काश्मीरला स्वर्ग करण्याचा १३० कोटी जनतेचा संकल्प आहे - नरेंद्र मोदी

14:45 (IST)19 Sep 2019
आमच्यासाठी देशापेक्षा मोठं काही नाही - नरेंद्र मोदी

भाजपा सरकारचा अर्थच आहे की देशाच्या सुरक्षेसाठी प्राथमिकता असून आमच्यासाठी देशापेक्षा मोठं काही नाही असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

14:42 (IST)19 Sep 2019
देशाच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्द आहे - नरेंद्र मोदी

देशाच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्द आहे. आधीच्या सरकारची मात्र काय भूमिका होती हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. २००९ रोजी आपल्या लष्कराने १ लाक ८६ हजार बुलेटप्रूफ जॅकेटची मागणी केली होती. पुढील पाच वर्षात काँग्रेस सरकारने लष्कराच्या मागणीकडे लक्ष दिलं नाही. त्यांच्यासाठी जॅकेट खरेदी केलं नाही. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही खरेदी प्रक्रिया सुरु केली - नरेंद्र मोदी

14:30 (IST)19 Sep 2019
महाराष्ट्र आणि गुजरात कधी काळी एकाच ताटात जेवायचे - नरेंद्र मोदी

महाराष्ट्र आणि गुजरात कधी काळी एकाच ताटात जेवायचे. गुजरातमध्ये सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री म्हणून सेवा करण्याची संधी मला दिली. जो फायदा देवेंद्र फडणवीस यांना मिळाला आहे तो कधीकाळी मला मिळाला होता - - नरेंद्र मोदी

14:28 (IST)19 Sep 2019
नरेंद्र मोदींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

देवेंद्र फडणीस यांनी महाराष्ट्राला एक नवी दिशा दिली आहे. आता महाराष्ट्राला पुन्हा स्थिर राजकारणाची संधी आहे - नरेंद्र मोदी

14:21 (IST)19 Sep 2019
मी देवेंद्र फडणवीस यांना नमन करण्यासाठी आलो आहे - नरेंद्र मोदी

मी देवेंद्र फडणवीस यांना नमन करण्यासाठी आलो आहे. चार हजार किमीच्या यात्रेत कोट्यवधी लोकांनी आशीर्वाद दिला आहे - नरेंद्र मोदी

14:18 (IST)19 Sep 2019
नरेंद्र मोदींकडून उदयनराजेंचं आभार

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे यांनी माझ्या डोक्यावर एक छत्र ठेवलं आहे. हा माझा सन्मान आहे - नरेंद्र मोदी

14:16 (IST)19 Sep 2019
नाशिकच्या पावन, धर्मभूमीला नमस्कार - नरेंद्र मोदी

नाशिकच्या पावन, धर्मभूमीला नमस्कार - नरेंद्र मोदी

14:15 (IST)19 Sep 2019
नरेंद्र मोदींकडून मराठीत भाषणाला सुरुवात

नरेंद्र मोदींकडून मराठीत भाषणाला सुरुवात

14:14 (IST)19 Sep 2019
आम्ही सेवक आहोत, सेवकच राहू

आम्ही सेवक आहोत, सेवकच राहू. पुढची पाच वर्ष पुन्हा आम्हाला सेवा करण्याची संधी द्या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

14:13 (IST)19 Sep 2019
महाराष्ट्रातील ८९ लाख लोकांना रोजगार

महाराष्ट्रातील ८९ लाख लोकांना रोजगार दिला - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

14:12 (IST)19 Sep 2019
शरद पवारांना मुख्यमंत्र्यांचं उत्तर

शरद पवारजी तुमची मानसिकताच राजेशाही होती. सेवकाचं काम असतं जनतेमध्ये जाऊन हिशोब देणं. म्हणून लोकांनी तुमचा पराभव करुन सेवकांना निवडून दिलं. यापुढेही ते सेवकांना निवडून देतील. काँग्रेसचं तर महाराष्ट्रात अस्तित्वच दिसत नाही. गेल्या निवडणुकीत मोदींचं नेतृत्त्व आणि शिवरायांचा आशिर्वाद होता आता तर त्यांच्या वंशाचीही आम्हाला सोबत आहे.

14:09 (IST)19 Sep 2019
उज्ज्वला योजनेमुळे महिलांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू

उज्ज्वला योजनेमुळे महिलांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होते - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

14:09 (IST)19 Sep 2019
महिलांनी केलेली गर्दी अभुतपूर्व - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाजनादेश यात्रेचं स्वागत करण्यासाठी महिलांनी केलेली गर्दी अभुतपूर्व - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

14:08 (IST)19 Sep 2019
मराठवाड्यातील अनेक लोकांनी मला सांगली, कोल्हापूरकरांसाठी मदत दिली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठवाड्यातील अनेक लोकांनी मला सांगली, कोल्हापूरकरांसाठी मदत दिली. साडे तीन कोटींचे चेक मला यावेळी देण्यात आले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

14:04 (IST)19 Sep 2019
महाराष्ट्र भ्रष्टाचारी आणि दलालांचा अड्डा झालं होतं - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री या नात्याने मोदींना भेटण्यासाठी गेले होतो तेव्हा काय अपेक्षा आहे विचारलं होतं. त्यावर मोदींनी सांगितलं होतं की, महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य होऊ शकतं, पण गेल्या काही वर्षात भ्रष्टाचारी आणि दलालांचा अड्डा झालं आहे. हा डाग हटवण्याचं काम केलं तर सर्वात मोठा न्याय होईल. गेल्या पाच वर्षात मी किती चांगलं काम करु शकलो माहीत नाही. पण आमच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही.

14:01 (IST)19 Sep 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले मोदींचे आभार

काश्मीरला भारतात आणण्याचं काम ज्याप्रकारे मोदींनी केलं आहे त्याबद्दल तुमचे आभार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

13:59 (IST)19 Sep 2019
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उदयनराजे भोसले यांचं कौतूक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उदयनराजे भोसले यांचं कौतूक

13:57 (IST)19 Sep 2019
देवेंद्र फडणवीस वसंतराव नाईक यांचा विक्रम मोडतील - चंद्रकांत पाटील

देवेंद्र फडणवीस वसंतराव नाईक यांचा साडे अकरा वर्षांचा मुख्यमंत्रीपदी राहण्याचा विक्रम देवेंद्र फडणवीस मोडतील - चंद्रकांत पाटील

13:56 (IST)19 Sep 2019
गेल्या पाच वर्षात एकही दंगल झालेली नाही - चंद्रकांत पाटील

गेल्या पाच वर्षात एकही दंगल झालेली नाही, पोलिसांच्या बंदुकीतून एकही गोळी सुटलेली नाही - चंद्रकांत पाटील

13:53 (IST)19 Sep 2019
...असं करणारे देवेंद्र फडणवीस पहिले मुख्यमंत्री - चंद्रकांत पाटील

वसंतराव नाईक यांच्यानंतर पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस पहिले मुख्यमंत्री - चंद्रकांत पाटील

13:51 (IST)19 Sep 2019
नाशिककरांनी इचलकरंजीचा विक्रम तोडला

महाजनादेश यात्रेच्या स्वागतामध्ये नाशिककरांनी इचलकरंजीचा विक्रम तोडला - चंद्रकांत पाटील

13:50 (IST)19 Sep 2019
चंद्रकांत पाटील यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात जाऊन असा यशस्वी दौरा करणारे देवेंद्र फडणवीस पहिलेच मुख्यमंत्री - चंद्रकांत पाटील

13:49 (IST)19 Sep 2019
नरेंद्र मोदींना देशसावियांनी ह्रदयात स्थान दिलं आहे - चंद्रकांत पाटील

नरेंद्र मोदींना देशसावियांनी ह्रदयात स्थान दिलं आहे - चंद्रकांत पाटील

13:48 (IST)19 Sep 2019
उदयनराजे भोसले यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पगडी घालून स्वागत

मोदींच्या सभेसाठी उदयनराजे भोसले उपस्थित असून उदयनराजे भोसले यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पगडी घालून स्वागत करण्यात आलं

13:47 (IST)19 Sep 2019
गिरीश महाजनांचं मोदींना आश्वासन

उत्तर महाराष्ट्रातील ४७ पैकी ४५ ते ४६ जागा आपण जिंकू, गिरीश महाजनांचं मोदींना आश्वासन