पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पोलाद पुरुष आहेत असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं साताऱ्यात कौतुक केलं. कलम ३७० वरुन मोदींवर टीका केली जाते मात्र देशाचे जवान आपल्याला महत्त्वाचे नाहीत का? त्यामुळे कलम ३७० हटवलं आणि तो मुद्दा विधानसभा निवडणूक प्रचारात आणला तर बिघडलं काय? असंही उदयनराजे यांनी विचारलं. पश्चिम महाराष्ट्र काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. लोकांनी काँग्रेस राष्ट्रवादीला मतांमधून आशीर्वाद दिला. मात्र यामुळे त्यांचा अहंकार वाढला. हा अहंकार मोडून काढायचा आहे अशीही टीका उदयनराजेंनी केली.

सातारा ही चळवळीची भूमी आहे, या भूमीत स्वातंत्र्याची चळवळ, देशरक्षणाची चळवळ झाली आहे. या मातीचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नातं आहे. त्यांचे गुरु लक्ष्मणराव इनामदार हे देखील साताऱ्यातलेच होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार, भारताबाबतचं त्यांचं व्हिजन यामुळेच विकास होतो आहे असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांवर मोदी सरकारची वाटचाल होते आहे असंही उदयनराजे भोसले म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवाजी महाराजांच्या विचारांना तिलांजली दिली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी तसे नाही. तळागाळातल्या लोकांबाबत त्यांना आस्था आहे, काँग्रेस राष्ट्रवादीने तळागाळातल्या लोकांना गाळात घातलं असाही घणाघाती आरोप उदयनराजे भोसले यांनी केला. साताऱ्यातल्या प्रचारसभेत ते बोलत होते.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी फक्त स्वार्थ साधला अशीही टीका उदयनराजेंनी त्यांच्या भाषणात केली. तर मोदींनी सर्वांगिण आणि सर्वसमावेशक विचार देशाला दिला. त्यामुळे त्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे असंही उदयनाराजे यांनी म्हटलं आहे.