मोदी उवाच : राममंदिरावर बोलणारे ‘बडबोले’ * पुढील बहुमताचे सरकार भाजपचेच

मुंबई / नाशिक :  भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, राममंदिराचा प्रश्न न्यायालयात असताना काही ‘बडबोले’ आणि ‘बयान बहाद्दर’ निर्थक चर्चा घडवून आणत आहेत, अशी टीका केली. तसेच फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बहुमताचे सरकारच सत्तेत येईल, असा ठाम विश्वास व्यक्त करीत युतीचा उल्लेख टाळला. या उल्लेख-अनुल्लेखांमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्काना उधाण आले आहे.

या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षांव करीत मोदी यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचाराचा प्रारंभ केला. राजकीय अस्थिरतेमुळे प्रगती खुंटते, असे वक्तव्य करून एकहाती स्थिर सरकारची भाजपची भूमिकाच मोदी यांनी अधोरेखित केली आहे.

मोदी म्हणाले की, ‘‘पूर्ण बहुमत नसतानाही देवेंद्र फडणवीस यांनी  गेली पाच वर्षे महाराष्ट्राला स्थिर सरकार दिले आहे.

आता तर, जे अपेक्षेप्रमाणे काम करतात त्यांना आशीर्वाद देण्याचे महाराष्ट्राच्या जनतेनेच ठरविले आहे.’’

जम्मू आणि काश्मीरमधील ३७० कलम रद्द केल्यानंतर आता राम मंदिरासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा आणि मंदिराची पहिली वीट रचण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी मांडली आहे. या पाश्र्वभूमीवर मोदी म्हणाले की, ‘‘राम मंदिरावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयात सर्व संबंधित आपली बाजू मांडत आहेत. तरीही गेले दोन-तीन आठवडे काही ‘बडबोले’ आणि ‘बयान बहाद्दर’ राम मंदिराबाबत निर्थक चर्चा घडवून आणत आहेत. अशा लोकांनी न्यायालयाचा आदर राखावा.’’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर थेट हल्ला चढवितानाच त्यांनी शिवसेनेलाही हलकेच चिमटे काढले. घटनेचे ३७०वे कलम रद्द करण्यावरून मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केले. पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याने मतांच्या राजकारणासाठी चुकीची भूमिका घेतल्याबद्दल त्यांनी नापसंती व्यक्त केली.

भाजप आणि शिवसेना युतीच्या जागावाटपाचे घोडे सध्या अडले आहे. शिवसेनेला जास्त जागा हव्या असल्या तरी भाजपची त्या देण्याची तयारी नाही. भाजपच्या सभेत शिवसेनेचा उल्लेख होणार नाही, हे अधोरेखित असले तरी मोदी यांनी मित्रपक्ष किंवा युती, लहान भाऊ, असा काहीही उल्लेख केला नाही. उलट भाषणात सातत्याने राज्यातील भाजप सरकार असाच उल्लेख केला.

एक-दोन दिवसांत निवडणुकीची घोषणा?

महाराष्ट्रासह हरियाणा विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम एक- दोन दिवसांत जाहीर होण्याचे संकेत आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्यासह आयोगाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबईत येऊन नुकताच निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. दिल्लीत निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.

निम्म्या जागांचा आग्रह सोडण्यास सेना राजी

मुंबई : भाजपच्या आक्रमक भूमिकेनंतर निम्म्या जागांचा आग्रह सोडण्याची तयारी शिवसेनेने दर्शवली आहे. किमान १२६ जागा मिळाव्यात, अशी शिवसेनेची अपेक्षा असल्याचे समजते. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शुक्रवारी ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा हे रविवारी मुंबई दौऱ्यावर असून, त्यावेळी युतीबाबत निर्णय होण्याचे संकेत आहेत.