पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानात जिथे ही सभा पार पडणार आहे तेथील जवळपास १५ ते १६ झाडं कापण्यात आली आहेत. दरम्यान आम आदमी पक्षाने याचा निषेध केला असून पंतप्रधानांनी दाखवलेले निसर्ग प्रेम खोटे आणि दिखाऊ असल्याची टीका केली आहे. आम आदमी पक्षाचे पर्वती मतदारसंघातील उमेदवार संदीप सोनावणे यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी करत दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

संदीप सोनावणे यांनी निषेध करताना म्हटलं आहे की, “पंतप्रधानांनी मागील आठवड्यात दाखवलेले निसर्ग प्रेम खोटे आणि दिखाऊ असल्याचे या घटनेवरून सिद्ध झाले आहे. आरे जंगलतोडीची घटना असो किंवा मुख्यमंत्र्यांच्या रथासाठी सिंहगड रस्त्यावरील झाडे तोडण्याचे प्रकरण असो भारतीय जनता पक्ष मुजोरपणे वागत असून सर्रासपणे नियम आणि निसर्गाची पायमल्ली करीत आहे”.

पुणे- नरेंद्र मोदींच्या सभेत अडथळा ठरणाऱ्या झाडांची कत्तल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या गुरुवारी पुण्यात प्रचारसभा पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने नरेंद्र मोदींची ही सभा पार पडणार आहे. पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानात ही सभा पार पडणार असून त्यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान यावेळी कॉलेजच्या परिसरातील झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. परिसरातील अनेक मोठी झाडे सोमवारी रात्री कापण्यात आली आहेत. सभेत अडथळा ठरणारी सर्व झाडे कापण्यात आली असून जमिनीचं सपाटीकरण करण्यात आलं आहे.

एसपी कॉलेजच्या मैदानात व्यासपीठ उभारण्याचं काम सुरु आहे. यावेळी अडथळा ठरणारी जवळपास १५ ते १६ झाडे कापण्यात आली आहेत. दरम्यान आयोजकांनी मात्र सुरक्षेच्या कारणास्तव झाडं कापण्यात आली असल्याचं सांगितलं आहे.

यानंतर नरेंद्र मोदींची संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुण्यात सभा पार पडणार आहेत. एसपी कॉलेजच्या मैदानात ही सभा पार पडणार आहे. या सभेनंतर नरेंद्र मोदी पुन्हा दिल्लीला रवाना होतील. शुक्रवारी १८ तारखेला मुंबईत सभा घेत नरेंद्र मोदींच्या प्रचाराची सांगता करतील.