30 October 2020

News Flash

पवारांच्या मराठवाडा दौऱ्यात संघटनात्मक बांधणीवर भर

मराठवाडय़ातील मराठा मतांच्या ध्रुवीकरणाकरिता सत्ताधाऱ्यांना ‘अनाजी पंत’ ठरविण्याचा प्रयत्न खुबीने करण्यात आला.

औरंगाबाद येथे  राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा आसुड देऊन सत्कार करण्यात आला.

सुहास सरदेशमुख

लोकसत्ता वृत्तवेध

मराठवाडा दौऱ्याच्या माध्यमातून पक्षात झालेली पडझड रोखण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करतानाच भाजपला थेट लक्ष्य केले. मराठवाडय़ातील मराठा मतांच्या ध्रुवीकरणाकरिता सत्ताधाऱ्यांना ‘अनाजी पंत’ ठरविण्याचा प्रयत्न खुबीने करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे राष्ट्रवादीतून आलेले ‘सरदार’ आणि  शरद पवार यांच्या व्यासपीठावर धनंजय मुंडे, महेबूब पाशा असे आक्रमक भाषण करणारे नेते दिसत असल्याने भाजपच्या पारंपरिक ओबीसी मतदारांमध्ये अस्वस्थता दिसत होती. अर्थात भाजपही ध्रुवीकरणावर भर देत असल्याचे चित्र आहे.

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनापासून मराठवाडय़ाच्या दौऱ्यावर असणारे शरद पवार यांनी सर्वात आधी उस्मानाबाद गाठले. राणाजगजीतसिंह पाटील यांच्या भाजपप्रवेशामुळे तेथील पडझड रोखण्यासाठी त्यांनी घेतलेल्या बैठकीचे रूपांतर मेळाव्यात झाले आणि तेथे ते म्हणाले, ‘‘बघू कोण कुस्ती खेळतो?’’ स्थानिक नेतृत्वाला आव्हान देत कार्यकर्त्यांशी बोलताना व्यासपीठावरील धनंजय मुंडेसारख्या आक्रमक नेत्याच्या भाषणात छत्रपती उदयनराजे यांच्या भाजपप्रवेशानंतर नवाच मुद्दा पुढे येत गेला. ‘‘जाऊ नका तिथे, तुमचा मेळ बसायचा नाही; पण राजे गेले. काय वेळ आली आहे, आता राजे अनाजी पंतांकडे जात आहेत, हे पाहण्याची वेळ आपल्यावर आली आहे,’’ असा उल्लेख धनंजय मुंडे करायचे, तेही पवारांच्या उपस्थितीमध्ये. अनाजी पंतांचा हा उल्लेख जातीय राजकारणावर बोट ठेवणारा असला तरी तो योग्यच, असे मानणारा तरुण या मुद्दय़ाला अधिक टाळय़ा वाजवत होता, हे चित्र मराठवाडय़ात होते.

अनाजी पंताच्या मुद्दय़ावर पवार काही बोलत नव्हते. मात्र, शरद पवार गड-किल्लय़ांमध्ये हॉटेल चालविण्यास दिलेल्या परवानगीचा मुद्दा पुढे रेटत आता किल्लय़ांमध्ये तरुणांनी छमछम पाहायला जायचे काय, असा सवाल करत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन राज्यकारभार करीत असल्याचा  सरकारचा दावा फोल ठरविण्यासाठी मुंबईत समुद्रातील पुतळय़ाचा मुद्दाही राष्ट्रवादीच्या प्रचाराचा मुद्दा होता. शेती आणि उद्योगातील अस्वस्थता पवार तरुण कार्यकर्त्यांसमोर मांडत होते. आपल्याला सोडून गेलेल्या नेत्यामुंळे राष्ट्रवादीवर फारसा परिणाम झाला नाही, असा संदेश देण्यासाठी त्यांनी मराठवाडय़ात काढलेला दौरा प्रतिसाद देणारा ठरला आहे.

ज्या मराठवाडय़ातून मराठा समाजाचे आंदोलन उभे राहिले त्या भागात विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना ‘अनाजी पंत’ ठरविताना राष्ट्रवादीतील सरदार भाजपमध्ये का जात आहेत, असा प्रश्न विचारला जात होता.

राणाजगजीतसिंह पाटील, जयदत्त क्षीरसागर, सुरेश धस ही नेतेमंडळी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेली. त्यामुळे या मतदारसंघात नव्याने बांधणी करण्यासाठी राष्ट्रवादीला प्रयत्न करावे लागणार आहेत. मात्र, राजकीय पटावर आपल्या विचारांचा मतदार एकगठ्ठा राहावा, असे करताना अन्य जाती-धर्मातूनही पाठिंबा मिळावा, अशी रचना पवार वयाच्या ८० व्या वर्षी करीत असल्याचे दिसून आले.

उसाच्या राजकारणाची पाठराखण

पावसाळा संपत असताना मराठवाडय़ातील धरणांमधील पाणीसाठा तळाला आहे. त्यावर उपाययोजना म्हणून मराठवाडय़ात ऊसबंदी केली जावी, अशी शिफारस विभागीय आयुक्तांनी केली. त्यामुळे सुरू झालेल्या चर्चेत पवार यांनी पुन्हा ऊस पिकाची पाठराखण केली. बारामतीसह वसंतदादा साखर संघाच्या वतीने कमी पाण्यात ऊस पीक घेण्यासाठी कसे प्रयोग सुरू आहेत हे सांगितले. असे करताना हा अहवाल सादर करणाऱ्या अधिकाऱ्यावरही त्यांनी टीका केली. शरद पवार यांनी उसाच्या राजकारणाची केलेली पाठराखण त्यांच्या राजकारणाचा भाग असल्याचे मानले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2019 1:25 am

Web Title: polarization of votes during sharad pawars visit to marathwada abn 97
Next Stories
1 पंतप्रधानांनी माहिती न घेता बोलणे अयोग्य- पवार
2 कासीम रझवीचा वैचारिक वारसा चालवायचा नाही!
3 भाजपच्याच काळ्या यादीतील सिंचन प्रकल्प सत्तांतरानंतर पावन!
Just Now!
X