राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. मुख्यमंत्रीपदावरुन चर्चा फिस्कटल्यानंतर शिवसेनेने भाजपासोबत युती तोडली आणि आता काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सध्या तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरु असून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र शिवसेनेने भाजपाशी युती तोडल्याने उद्धव ठाकरेंविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. औरंगाबादमधील बेगमपुरा पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

रत्नाकर भीमराव चौरे यांनी ही तक्रार केली आहे. तक्रारीत त्यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नावाखाली मते मिळवल्यानंतर सत्ता स्थापनेच्या वेळी युती तोडली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करून फसवणूक केली असल्याचं म्हटलं आहे. तक्रारीत माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि नवनिर्वाचित आमदार प्रदीप जैस्वाल यांचादेखील उल्लेख करण्यात आला आहे. रत्नाकर चौरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह चंद्रकांत खैरे, प्रदीप जैस्वाल यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

आणखी वाचा- “शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षासोबत आघाडी करु नका”, मुस्लिम कार्यकर्त्यांचं सोनिया गांधींना पत्र

तक्रारीत काय लिहिलं आहे ?
२०१९ विधानसभा निवडणुकीत नवनिर्वाचित आमदार प्रदीप जैस्वाल, चंद्रकांत खैरे आणि उद्धव ठाकरे यांनी १० ते १२ ऑक्टोबर दरम्यान औरंगाबदमध्ये प्रचार करुन हिंदुत्त्वाचे रक्षण करण्यासाठी, हिरवा गाडण्याकरिता शिवसेना, भाजप महायुतीला मतदान करा असं सांगितलं होतं. मी आणि माझ्या कुटुंबाने त्यांच्या खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवून महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांना मतदान करुन निवडून दिले.

२०१९ च्या निवडणुकीचा निकाल पाहता असे दिसून येते की, भाजपाच्या समर्थकांची पडलेली मते पाहता प्रदीप जैस्वाल निवडून आले. निकालानंतर शिवसेनेने भाजपाशी असलेली युती तोडून सरकार स्थापन केले नाही. त्यामुळे मी त्यांना भाजपा समर्थक आणि हिंदुत्त्वाचं रक्षण करण्यासाठी केलेले मतदान वाया गेल्यासारखे वाटते.