पुणे : निवडणुकीच्या प्रचार साहित्यातून आम्ही पूर्वीच प्लास्टिक हद्दपार केले आहे. मात्र, प्लास्टिकचा वापर असलेल्या प्रचार साहित्याची विक्री करू नये तसेच कार्यकर्त्यांनीही खरेदी करू नये यासंदर्भात प्रबोधन करणार असल्याची माहिती ‘मुरुडकर झेंडेवाले’चे गिरीश मुरुडकर यांनी सोमवारी दिली.

मुरुडकर म्हणाले, राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून प्रचार साहित्यासंदर्भात राजकीय पक्षांसह संभाव्य उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून चौकशी करणारे दूरध्वनी सातत्याने येत आहेत. एरवी स्वस्तामध्ये मिळणारा माल म्हणून प्लास्टिकच्या साहित्याला मोठय़ा प्रमाणावर मागणी असते. राज्याने प्लास्टिक बंदी लागू करण्यापूर्वीच आम्ही प्लास्टिकच्या प्रचार साहित्याची निर्मिती बंद केली आहे. मात्र, आता निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर परराज्यांतून प्लास्टिकचा वापर करून निर्मिती केलेले प्रचार साहित्य बाजारपेठेमध्ये येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत प्लास्टिकचा वापर असलेल्या प्रचार साहित्याची विक्री करू नये याविषयी दुकानदारांसह राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही असे साहित्य खरेदी करू नये याविषयी प्रबोधन करण्यात येणार आहे.

प्रचार साहित्यामध्ये विविध पक्षांचे झेंडे, शर्टावर लावण्याचे बॅचेस, उपरणी, शाही उपरणी, फेटे आणि पगडय़ा या विषयी सध्या केवळ चौकशी सुरू झाली आहे. उमेदवारी निश्चित होत नाही तोपर्यंत खरेदी केली जाईल, असे वाटत नाही. यंदा आम्ही बॅचेस, फेटे आणि पगडय़ांचे नावीन्यपूर्ण प्रकार आणणार आहोत, असे मुरुडकर यांनी सांगितले.

आघाडीबाबत उत्सुकता

काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या पक्षांच्या प्रचार साहित्याला नेहमीची मागणी असते. मात्र, मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांची आघाडी होणार की स्वतंत्रपणे लढणार याची उत्सुकता लागून राहिली आहे, असे गिरीश मुरुडकर यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारांची फळी होण्याची शक्यता असते हे ध्यानात घेऊन अपक्ष उमेदवारांच्या प्रचाराचे साहित्य तयार ठेवण्याची कसरत सांभाळावी लागते, याकडे मुरुडकर यांनी लक्ष वेधले.