राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. निरज खटी दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारार्थ चक्क उतरल्याचे फोटो व्हायरल झाले होते. याविरोधात निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्यावर राजकीय दबाव असल्यामुळे कुलसचिव डॉ. खटींवर विद्यापीठाकडून अद्याप प्रशासकीय कारवाई केली जात नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या काही वर्षांत सत्ताधारी पक्षाकडून शैक्षणिक संस्थांचा वापर हा राजकीय फायद्यासाठी केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होत असतो. नुकताच विद्यापीठाध्ये दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र या संघ परिवारातील संस्थेचा अहवाल प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. वर वर या कार्यक्रमाचे स्वरूप सामाजिक वाटत असले तरी हा कार्यक्रम नागपुरात आयोजित करण्यामागचा हेतू जाणून घेतल्यास त्यामागे आयोजकांचा प्रचारकी हेतू असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. त्यासाठी विद्यापीठाचा खुबीने वापर करण्यात आला आहे.

आता निवडणुकीच्या काळात थेट विद्यापीठांमध्ये अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून सरकारच्या योजनांचा प्रचार केला जात असल्याचा प्रकारही नुकताच घडला. त्यामुळे नागपूर विद्यापीठाचा विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी पूर्णपणे वापर केला जात असल्याचे चित्र आहे. त्यातच विद्यापीठाच्या महत्त्वाच्या अशा प्रभारी कुलसचिव पदाची धुरा सांभाळत असलेल्या डॉ. नीरज खटी यांच्याकडून आचारसंहिता काळात एखाद्या राजकीय पक्षाचे चिन्ह असलेला दुपट्टा घालून प्रचार करताना दिसत असतानाही विद्यापीठ प्रशासनाने त्यांना साधी कारणे दाखवा नोटीस बजावलेली नाही. कुलसचिव विद्यापीठात प्रमुख प्रशासकीय अधिकारी असतात. तेच कुणा पक्षाच्या प्रचारात सहभागी होणे हे अनाकलनीय आहे.