पती-पत्नीकडून १३ कोटींहून अधिक रकमेचे कर्जवाटप केल्याची प्रतिज्ञापत्रातील माहिती

३५-४० वर्षांपूर्वी धुळय़ातील सर्वसामान्य कुटुंबातून मुंबईत पोलीस सेवेत रुजू झालेले चकमकफेम निवृत्त अधिकारी प्रदीप शर्मा हे नालासोपारा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढवत आहेत. गेल्या ३५ वर्षांच्या सेवेत जवळपास पावणे दोन कोटींची मालमत्ता जमवल्याची माहिती शर्मा यांनी उमेदवार प्रतिज्ञापत्रात दिली आहे. मात्र, शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती यांची मालमत्ता मात्र २४ कोटींच्या घरात आहे. त्याहून विशेष म्हणजे, शर्मा दाम्पत्याने स्वतंत्रपणे विविध आस्थापना, व्यक्तींना तब्बल १३ कोटींहून अधिक रुपये कर्ज वा आगाऊ रकमेपोटी दिल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

१९८३मध्ये पोलीस दलात सहभागी झालेले शर्मा धुळ्यातील सर्वसामान्य कुटुंबातून आहेत. पोलीस दलातून निवृत्त होताना त्यांच्या नावावर ११३ चकमकींची नोंद आहे. त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार शर्मा यांची १ कोटी ८१ लाख तर त्यांच्या पत्नी स्वीकृती यांची २४ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. शर्मा यांच्या नावे स्थावर मालमत्ता नाही. मात्र स्वीकृती यांच्या नावे शेतकी भूखंड, व्यावसायिक गाळे आणि घर अशी २० कोटी ३७ लाख इतकी स्थावर मालमत्ता आहे. धक्कादायक बाब ही की, शर्मा यांनी १ कोटी ४४ लाख तर स्वीकृती यांनी १२ कोटी २४ रुपये कर्जापोटी किंवा आगाऊ रक्कम म्हणून विविध आस्थापना, व्यक्तींना दिल्याची नोंद       प्रतिज्ञापत्रात आढळते.

या व्यवहारांमध्येही गमतीजमती आढळतात. शर्मा यांनी स्वीकृती यांना, स्वीकृती यांनी शर्मा यांना, दोघांनी आपल्या अपत्यांना लाखोंचे कर्ज दिल्याचे नमूद आहे. शर्मा यांनी एस. पी. मोटेल्स यांना सुमारे एक कोटी १५ लाख तर स्वीकृती यांनी गणेशानंद डेव्हलपर्स या कंपनीला ११ कोटी २५ लाख रुपये कर्ज किंवा आगाऊ रक्कम म्हणून पैसे दिले आहेत. स्वीकृती यांनी दिलेल्या कर्जाची, आगाऊ रकमांची जंत्री मोठी असून त्यात काही बांधकाम व्यावसायिक आणि व्यक्तींचा उल्लेख आहे. प्रत्यक्षात या संपूर्ण प्रतिज्ञापत्रात स्वीकृती यांच्या व्यवसायाबाबत मात्र अवाक्षरही नाही.

हीच गंमत घेतलेल्या कर्जाबाबतही आहे. स्वीकृती यांनी शर्मा आणि अपत्यांकडून वैयक्तिक कर्ज घेतल्याचे नमूद आहे. स्वीकृती यांनी अ‍ॅक्सिस बॅंकेकडून सुमारे सहा कोटींचे कर्ज घेतल्याची नोंद आहे. उर्वरित कर्जदारांमध्ये अर्बन हॉक सिक्युरिटी सव्‍‌र्हिसेसच्या नावे सुमारे सहा कोटी, अविनाश डेव्हलपर्सच्या नावे ८५ लाख आणि अन्य व्यक्ती, बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांकडून ५० हजार ते दहा लाख रुपयांपर्यंतची कर्जे नमूद आहेत. स्वीकृती यांच्या नावे कल्याण तालुक्यात सुमारे ६ कोटींची बीनशेती जमीन आहे. मुंबई आणि पुण्यात दोन कोटींचे निवासी गाळे आहेत. तर अंधेरी-ठाण्यात १२ कोटींचे व्यावसायिक गाळे आहेत. याबाबत शर्मा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते निवडणूक प्रचारात व्यस्त होते. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

चार माजी पोलीस अधिकारी रिंगणात

प्रदीप शर्मा यांच्या व्यतिरिक्त माजी पोलीस अधिकारी समशेर खान पठाण, गौतम गायकवाड आणि राजेश पाडवी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पठाण यांनी निवृत्तीनंतर अनेकदा निवडणुकांत नशीब आजमावलेले आहे. यंदा ते मुंबादेवी मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. बहुचर्चित बेबी पाटणकर अमलीपदार्थ प्रकरणातून दोषमुक्त झाल्यानंतर गायकवाड यांनी राजकारणात उडी घेतली. ते वरळी मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे रिंगणात आहेत. पाडवी यांना शहादा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार उदयसिंह पाडवी यांचे ते पुत्र आहेत.