देवेंद्र फडणवीस शिवसैनिक असतील तर मग त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा असा टोला प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांनी लगावला आहे. बच्चू कडू यांनी शिवसेनेला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. मातोश्रीवर शिवसेना आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. उद्या काही जण शरद पवारही शिवसैनिक आहेत असं म्हणतील असंही यावेळी ते म्हणाले.

“भाजपाकडून जर नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, तर मग मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्यात काहीच हरकत नसावी. शिवसेना आणि भाजपामध्ये ५०-५० फॉर्म्युला ठरला होता. शिवसेनेकडे यासंबंधी पुरावेदेखील आहेत. जर भाजपाने वचन दिले असेल तर त्यात मुख्यमंत्रीपदही येते. भाजपाला एवढं ताणून ठेवण्याची गरज नव्हती. भाजपा जर बोलल्याप्रमाणे करत नसेल, तर ते फसवणूक करत आहेत,” असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपण मातोश्रीवर आलो असल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांना मदत जाहीर होणं सध्या महत्त्वाचं आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. “युतीचा पेच सुटू शकतो इतका आमचा आकडा मोठा नाही. राजकारणात फोडाफोड होत असते. पण शिवसेनेला काही घाबरण्याची गरज नाही,” असंही बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. भाजपाने मोठा भाऊ समजून शिवसेनेला मुख्यमंत्री पद द्यावे असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं आहे.

सरकार स्थापन होईल तेव्हा होईल, पण अगोदर शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली पाहिजे. जर झाली नाही तर थेट आम्ही राज्यपालाच्या निवासस्थानावर मोर्चा काढणार आहोत असा इशारा बच्चू कडू यांनी यावेळी दिला. “शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी आता राज्यपालांनी पुढाकार घेतला पाहिजे. सरकार बनेल तेव्हा बनेल अगोदर शेतकरी वाचला पाहिजे. अशा परिस्थितीत राज्यपालांनी पुढाकरा घेऊन निर्णय घ्यायला हवा,” अशी त्यांनी मागणी केली.