मुंबई : भाजप-शिवसेनेला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय देशात आणि राज्यात त्यांनी निर्माण केलेले भितीचे वातावरण संपणार नाही, असे प्रतिपादन  वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी केले. चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते.

प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा भाजप-शिवसेनेवर  टीका केली. या सरकारकडून कधीही, कोणाच्याही घरी सक्तवसुली संचालनालय, प्राप्तिकर, पोलीस अशा यंत्रणा पाठवून धरपकड केली जाते. त्यामुळे भितीचे वातावरण तयार झाल्याचे ते म्हणाले. भाजप-शिवसेना सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या काळात लहान मोठे दोन लाख व्यवसाय, उद्योग बंद पडले. त्यावर अवलंबून असणारे आठ लाख कामगार बेरोजगार झाले. आता पुन्हा भाजपच्या जाहीरनाम्यात एक कोटी नोकऱ्यांचे आश्वासन देण्यात आले आहे. हे सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे, असा आरोप त्यांनी केला.