राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत कोणताही पक्ष सत्ता स्थापन करू न शकल्याने, राज्यात अखेर आज सायंकाळी राष्ट्रपती राजवट लागू झाली. यावर भाजपाचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रपती राजवट लागणे हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र याबरोबरच त्यांनी राज्याला स्थिर सरकार मिळेल, ही अपेक्षा असल्याचेही सांगितले आहे.
राज्यातील जनतेने अतिशय सुस्पष्ट जनादेश दिलेला असताना, देखील महाराष्ट्रात कोणतेही सरकार स्थापन न होणे आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागण्याचा प्रसंग राज्यावर ओढविणे, हे अतिशय दुर्दैवी आहे. मात्र, लवकरच राज्याला स्थिर सरकार प्राप्त होईल, अशी आपण अपेक्षा व्यक्त करतो, असे भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीत अतिशय सुस्पष्ट जनादेश महायुतीला मिळाला होता. मात्र राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊ शकले नाही आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवटीला सामोरे जावे लागले. आज राज्यापुढे अनेक प्रश्न आहेत, अशावेळी राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे राज्यात होणार्या गुंतवणुकीवर विपरित परिणाम होईल, अशी देखील फडणवीस यांनी भीती व्यक्त केली. यामुळे सरकारचे दैनंदिन कामकाज प्रभावित होईल आणि पर्यायाने जनतेचीच गैरसोय होईल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अवकाळी पावसाने आपला बळीराजा संकटात आहे. म्हणूनच माझी अपेक्षा आहे की, सर्वच पक्ष या स्थितीचा गांभीर्याने विचार करतील आणि राज्याला स्थिर सरकार लवकरच मिळेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच सुटू न शकल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यपालांनी जो प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवला होता त्या प्रस्तावावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सही केली आहे. आज सकाळपासूनच आजच राष्ट्रपती लागू होईल अशी चर्चा सुरु होती. यासंदर्भातली शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली होती. भाजपाने सत्ता स्थापनेसाठी असमर्थता दाखवल्यानंतर शिवसेनेला संधी देण्यात आली. मात्र शिवसेना दावा सिद्ध करु शकली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला त्यानंतर चोवीस तासांची मुदत देण्यात आली मात्र त्याच्या आतच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपती राजवटीच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 12, 2019 9:17 pm