अलिबाग : विधानसभा निवडणूक शांततेत आणि भयमुक्तपणे पार पडाव्यात यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. जिल्ह्य़ांत आत्तापर्यंत १ हजार ६४६ जणांवर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४९ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

यात चार आमदारांचाही समावेश आहे. लोकसभा निवडणूक मतमोजणी प्रक्रियेदरम्यान मतमोजणी केंद्रावर बेकायदेशीरपणे घुसखोरी आणि पत्रकार मारहाणप्रकरणी दाखल गुन्ह्य़ाच्या अनुषंगाने शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांच्यासह आमदार पंडित ऊर्फ सुभाष पाटील, धैर्यशील पाटील आणि अनिकेत तटकरे यांच्यावर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे.

तर ३७ जणांवर महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये हद्दपारीचे प्रस्ताव करण्यात आले आहेत.

विधानसभा निवडणूक राज्यात लागली असून निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक काळात गुन्हे घडवलेल्या व्यक्तीवर तसेच गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या व्यक्तीवर पोलिसामार्फत प्रतिबंधक कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्य़ात आत्तापर्यंत १ हजार ६४६ जणांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. यात चार आमदारांचाही समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीत मतमोजणी वेळी निवडणूक आयोगाचे प्राधिकारपत्र नसताना अनधिकृतपणे घुसून आमदार जयंत पाटील, पंडित पाटील यांनी ‘लोकसत्ता’चे पत्रकार हर्षद कशाळकर यांना मारहाण केली होती.

तर पेणचे आमदार धैर्यशील पाटील, विधान परिषद सदस्य अनिकेत तटकरे यांनी मतमोजणी केंद्रावर बेकायदेशीरपणे प्रवेश केला होता. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून याबाबतचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेले आहे.

विधानसभा निवडणूकीच्या पाश्र्वभुमीवर दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने चार आमदारांना फौजदारी दंड संहिता कलम १४९ नुसार प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे. निवडणूक काळात त्यांनी कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास त्यांच्यावर कलम १८८ नुसार कारवाई केली जाईल.

  – के. डी. कोल्हे, पोलीस निरीक्षक, अलिबाग पोलीस ठाणे.