सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच अखेर मंगळवारी घडलेल्या नाट्यमय राजकीय घडमोडीनंतर सुटला. याचबरोबर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येत असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर आज (बुधवार) सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर हे त्यांना आमदारकीची शपथ देत आहेत. या शपथविधी सोहळ्याला जाण्याअगोदर युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन सकाळी ८ वाजता दर्शन घेतले. याप्रसंगी त्यांच्याबरोबर शिवसेना नेते आदेश बांदेकर यांची उपस्थिती होती.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीच्यावतीने मुख्यमंत्रीपदासाठी एकमताने निवड करण्यात आलेली आहे.त्यांचा शपथविधी गुरुवारी शिवाजी पार्कवर होणार असल्याची माहिती शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दिली आहे. महाविकास आघाडीने मंगळवारी राज्यपालांकडे १६६ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर केले. राज्यपालांनी आघाडीला ३ डिसेंबरपर्यंत विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेण्यास सांगितले आहे.

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडी म्हणजेच महाविकास आघाडीच्या आमदारांची संयुक्त बैठक वांद्रे-कुर्ला संकुलातील ट्रायडेंट हॉटेलमध्ये मंगळवारी झाली. या बैठकीत महाविकास आघाडीचे नेते आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव सुचवणारा ठराव मांडला, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यास अनुमोदन दिले. या नव्या आघाडीबद्दल उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासह सोनिया गांधींचे आभार मानले. या बठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी राजभवनवर जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला.