शरद पवार यांच्याबरोबरच प्रदेश काँग्रेस नेत्यांचाही आग्रह

नवी दिल्ली : सातारा लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीवर काँग्रेस शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच पृथ्वीराज यांच्या नावाचा आग्रह धरला असल्याचे सांगितले जाते.

भाजपमध्ये प्रवेश करताना उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीबरोबरच होणार आहे. त्यासाठी भाजपकडून उदयनराजे भोसले यांचे नाव यापूर्वीच निश्चित झाले आहे.

उदयनराजे यांच्या विरोधात काँग्रेसआघाडी तगडय़ा उमेदवाराच्या शोधात होती. राजेंच्या विरोधात पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव शरद पवार यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना सुचवले. संभाव्य उमेदवारीबाबत चर्चा करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण गुरुवारी दिल्लीत आले होते. त्यांनी अहमद पटेल यांची भेट घेतली. उद्या ते पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उभे राहावे असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे असल्याचे प्रदेश काँग्रेसच्या नेत्याने पत्रकारांना सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शरद पवार यांनीच पोटनिवडणूक लढवावी, अशी मागणी करण्यात आली होती. पण पोटनिवडणूक लढविण्यास स्वत: पवार यांनी असमर्थतता व्यक्त केली आहे.

उमेदवारांची नावे निश्चित : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या छाननी समितीची पाचवी बैठकही गुरुवारी दोन टप्प्यांमध्ये दिल्लीत झाली. छाननी समितीची ही शेवटची बैठक असून काँग्रेसच्या बहुतांश जागांवरील उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. दुपारी पहिल्या टप्प्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत केंद्रीय निवडणूक समितीचीही बैठक झाली. त्यात काँग्रेस उमेदवारांबाबत अंतिम निर्णय घेण्यात आल्याचे समजते. निवडणूक समितीनंतर पुन्हा छाननी समितीची बैठक घेण्यात आली. त्यात उर्वरित १५-२० जागांबाबत चर्चा करण्यात आल्याचे समजते.

भाजपच्या मतांमध्ये वाढ

जिंकलेल्या जागा आणि टक्केवारी

१९८० – १४ (९.३८ टक्के)

१९८५ – १६ (७.२५ टक्के)

१९९० – ४२ (१०.७१ टक्के)

१९९५ – ६५ (१२.८० टक्के)

१९९९ – ५६ (१४.५४ टक्के)

२००४ – ५४ (१३.६७ टक्के)

२००९ – ४६ (१४.०२ टक्के)

२०१४ – १२२ (२७.८१ टक्के)

२०१९ लोकसभा – २७.६ टक्के