कराड : लोकसभेची सातारा मतदार संघाची पोट निवडणूक आपण लढणार असल्याचे वृत्त आपल्या विरोधकांनी पेरल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे बोलताना केला आहे.

कराड तालुक्यातील धोंडेवाडी व जखिणवाडी येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंत जगताप, पहिलवान नानासाहेब पाटील, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

चव्हाण म्हणाले, की आपण विधानसभेच्या कराड दक्षिण मतदार संघातूनच लढणार आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू असताना आपल्या नावाची चर्चा अचानकपणे सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी करण्यात आली. उदयनराजेंच्या विरोधात आपण लढणार असल्याचे हे वृत्त आपल्या विरोधकांनी पेरल्याचा आरोप  चव्हाण यांनी केला.

आपल्या प्रयत्नातून झालेल्या विकासाचे आकडे कोटींमध्ये आहेत. पण गेल्या पाच वर्षांत विरोधकांनी केलेली विकासकामे सांगावीत. त्यांच्या गावात रेठरे बुद्रुकलाही निधी दिला गेला. परंतु, स्थानिक नेतृत्वाने तो निधी नाकारला. हा दावा आपण जबाबदारीने करतो आहे. प्रत्येक गावात विकासकामे उभी केली. ती नेमकी कोणी केली हे लोकांना चांगले माहिती आहे. याकरिता गावोगावी माझ्या माध्यमातून झालेल्या विकासकामांचे फलक लावले गेले आहेत. यावर कुणाला काही शंका असेल, तर शासन अध्यादेश माझ्याकडे उपलब्ध असल्याचे चव्हाण यांनी ठामपणे सांगितले.

डॉ. इंद्रजित मोहिते म्हणाले, आपण इतरांच्या मिळकती व सहकारी संस्था गिळंकृत करण्यामध्ये धन्यता मानत नाही. सत्ता आणि पैशाची मस्ती असली, तरी कुटुंबप्रमुख आपणच आहोत. कृष्णा साखर कारखान्याची धोंडेवाडीची पाणीयोजना अडीच कोटींच्या तोटय़ात आहे. तरी, कृष्णाच्या सभासदांनी नव सावकारशाहीपासून वेळेत सावध राहावे.