शिवसेना आघाडीसोबत जाऊ नये यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरु आहेत असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. सत्तास्थापनेची खलबतं सुरु असताना आता आरोपांच्या फैरीही झडू लागल्या आहेत असंच दिसून येतं आहे. शिवसेनेसोबत आमची आघाडी होऊ नये म्हणून भाजपा पूर्ण प्रयत्न करत असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिन्यांशी संवाद साधत असताना त्यांनी हा आरोप केला.

शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या नेत्यांशी व्यापक चर्चा केली. मात्र शिवसेना एनडीएचा घटक होता तोपर्यंत चर्चा करणे शक्य नव्हते. त्यामुळे शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्यावर म्हणजेच अरविंद सावंत यांच्या राजीनाम्यानंतर चर्चा सुरु झाली. आम्ही आमदारांशी चर्चा करुन त्यासंबंधी सोनिया गांधी यांना कळवलं. सोनिया गांधी यांनी यानंतर आम्हाला दिल्लीत बोलावलं आणि चर्चाही केली असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान शरद पवार यांनीही उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. मात्र तोपर्यंत पाठिंब्याचं पत्र देण्यासाठी उशीर झाला होता. आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर पुढे जाऊ असं शरद पवार यांनीही स्पष्ट केलं. शरद पवार यांनी सोनिया गांधींशीही यासंदर्भात चर्चा केली असंही चव्हाण यांनी सांगितलं. त्यामुळे काँग्रेसने वेळकाढूपणा केला असं म्हणण्यात तथ्य नसल्याचंही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

किमान समान कार्यक्रम ठरवावा लागेल असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. आघाडीचा जाहीरनामा आणि शिवसेनेचा वचननामा घेऊन त्यातले कुठले मुद्दे घ्यायचे आणि कुठले वगळायचे हेदेखील ठरवावे लागेल असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.