18 October 2019

News Flash

युतीत रस्सीखेच सुरूच!

कल्याण पूर्व आणि पश्चिम या मतदारसंघांत या दोन्ही पक्षांत उघडपणे बंड झाल्याने त्याचे पडसाद आता जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या मतदारसंघांत पाहायला मिळू लागले आहेत.

|| जयेश सामंत-भगवान मंडलिक

ठाण्यात केळकर यांच्या प्रचारापासून शिवसेना नेते दूरच; कल्याणमध्ये गायकवाड यांच्याविरोधात बंडखोराला साथ:- ठाणे : ‘आमचं ठरलंय’ असे सांगून निवडणुकीत युती करणाऱ्या शिवसेना-भाजपमधील स्थानिक पातळीवरील संघर्ष शमण्याची चिन्हे नाहीत. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर नाराज झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गायकवाड यांच्याविरोधात बंडखोरी करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकामागे आपली ताकद लावली आहे. दुसरीकडे, कल्याण पश्चिममध्ये भाजपने आपली कुमक अपक्ष बंडखोर नरेंद्र पवार यांच्यामागे उभी केली आहे. ठाण्यातही शिवसेनेचे प्रमुख नेते संजय केळकर यांच्या प्रचारापासून दूरच आहेत. कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेच्या विरोधात उभे ठाकलेले मनसेचे राजू पाटील यांनी दिवा, आगासन परिसरातील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क वाढवल्याची चर्चा आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील १८ मतदारसंघांपैकी काही अपवाद वगळले तर जवळपास प्रत्येक मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये समन्वयातील दरी अगदी स्पष्टपणे जाणवत आहे. कल्याण पूर्व आणि पश्चिम या मतदारसंघांत या दोन्ही पक्षांत उघडपणे बंड झाल्याने त्याचे पडसाद आता जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या मतदारसंघांत पाहायला मिळू लागले आहेत. कल्याण पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे उल्हासनगर येथील नगरसेवक धनंजय बोडारे यांनी बंडखोरी केल्याने भाजपचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड दुखावले गेले आहेत. बोडारे हे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. शिंदे यांचे पाठबळ असल्याशिवाय बोडारे बंड करणे शक्यच नाही, असा गायकवाड समर्थकांचा होरा आहे. त्यामुळे बोडारे यांची बंडखोरी होताच गायकवाड यांनी थेट पालकमंत्र्यांवर टीकेचे आसूड ओढले. त्यानंतर येथे शिवसेनेची फळी अधिक ताकदीने बोडारे यांच्यामागे उभी राहिल्याचे चित्र आहे.

कल्याण पूर्वेत मागील १० वर्षांत गटार, पायवाटांव्यतिरिक्त एकही विकासाचे भव्यदिव्य काम झाले नाही. आमदाराची कामे काय हेच जर आमदारांना कळत नसेल तर पुन्हा त्याच उमेदवाराला आमदार म्हणून का निवडून द्यायचे, असा प्रश्न करीत शिवसेनेच्या कल्याण पूर्व, उल्हासनगरमधील १२५ हून अधिक शाखाप्रमुख, नगरसेवक, विभागप्रमुख, संघटक यांनी पदाचे राजीनामे देऊन बोडारे यांचा प्रचार सुरू केला आहे. देशात पुन्हा युतीचेच सरकार येवो हाच आमचा प्रयत्न आहे. फक्त कल्याण पूर्व विधानसभेसाठी या वेळी उमेदवार बदलण्यात यावा. काम करणाऱ्या माणसाला संधी द्यावी, ही आमची रास्त मागणी वरिष्ठ पक्षीय पातळीवर मान्य करण्यात आली नाही. त्यामुळे आम्ही पदाचे राजीनामे देऊन केवळ ठोकळेबाजपणे काम करणारा उमेदवार आमच्यावर पुन्हा लादला म्हणून नाराजी व्यक्त केली आहे, असे कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्र संघटक व शिवसेनेचे प्रशांत काळे यांनी सांगितले. १२५ हून अधिक पदाधिकारी बोडारे यांच्यासाठी काम करत असल्याचे समजते.

भाजपची मनसेला साथ?

कल्याण ग्रामीण मतदारसंघात काँग्रेस आघाडीने उमेदवार न देता मनसे उमेदवार राजू पाटील यांना साथ दिली आहे. या मतदारसंघातील दिवा आणि आसपासच्या परिसरात भाजप कार्यकर्त्यांची मोठी फळी असून ही मंडळी स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या विरोधात आहेत. त्यामुळे राजू पाटील यांच्यामागे भाजपचे काही स्थानिक नेते ताकद उभी करत असल्याच्या तक्रारी शिवसेनेकडून वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्या आहेत. शिवसेनेनेही येथे राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केल्याने येथील चुरस वाढली आहे. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संजय केळकर यांनी शिवसेनेतील नाराजांच्या भेटीगाठी सुरू केल्या असल्या तरी अजूनही त्यांना स्थानिक शिवसैनिकांकडून हवी तशी साथ मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

कल्याण पूर्वेत शिवसेनेचे १६ नगरसेवक

उल्हासनगर प्रभागातील १० नगरसेवक

 उल्हासनगर.. स्वीकृत दोन नगरसेवक

ग्रामीणमधील दोन नगरसेवक

कल्याण पूर्व, उल्हासनगर, ग्रामीण भागात मागील १० वर्षांत विकासकामे झाली नाहीत. लोकांना फक्त गटार, पायवाटांव्यतिरिक्त काहीही दिसत नाही. या भागात उद्याने, क्रीडांगणे, मनोरंजन केंद्र, रस्ते, पूल, पादचारी पूल ही कामे झाली पाहिजेत. ही आमदाराची कामे आहेत. लोकांची ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरलो आहे.

– धनंजय बोडारे, बंडखोर शिवसेना उमेदवार

First Published on October 10, 2019 2:27 am

Web Title: promotion shiv sena bjp akp 94