पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला नागरिकांना प्रवेश करण्यापुर्वी पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव, सोबत आणलेल्या बॅग आणि पर्स व अन्य सामान बाहेर ठेवण्यास सांगितले होते. मात्र, सभेनंतर काही नागिरकांच्या बॅगा आणि पर्स गायब झाल्याची घटना समोर आली आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यभरात सभा घेण्यात येत आहे. तर, आज पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सभा पार पडली. या सभेत कोणत्याही प्रकारच्या घोषणा किंवा अनुचित प्रकार घडता कामा नये. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मैदानाच्या परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

तर, सभेला येणार्‍या नागरिकांना सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी सोबत आणलेल्या बॅग, पर्स आतमध्ये घेऊन जाता येणार नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांननी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेरील फुटपाथवर बॅग व पर्स ठेवून सभास्थानावर प्रवेश केला होता. मात्र, मोदींची सभा संपताच, ज्या ठिकाणी बॅग, पर्स ठेवण्यात आल्या होत्या, त्या ठिकाणी नागरिकांनी जाऊन पाहिले असता अनेक नागरिकांच्या बॅग, पर्स अस्ताव्यस्त पडल्याचे तसेच काहीच्या बॅग आणि पर्स गायब झाल्याची आढळून आले. यामुळे नागरिकांना नाहक मनस्तापला सामोरे जावे लागल्याचे पहावयास मिळाले.