विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्यानतंर विधानसभा निवडणूक निकालाच्या पुर्वसंधेला पुण्यात आज वेगळ चित्र पाहायला मिळाले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राजकीय – सांस्कृतिक फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील हे देखील सहभागी झाले होते. यावेळी ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांनी राजकीय प्रवास आणि आवडीनिवडीबाबत विचारले असता, चंद्रकांत पाटील यांनी बालपणाच्या आठवणीना उजाळा देत, माझं एक कलापथक होतं, त्यावेळी तीन तासांचा कार्यक्रम करायचे असे सांगत, टिमक्याची चोली बाई… हे कोळी गीत देखील गायलं यावर उपस्थितांनी त्यांना टाळ्यांनी दाद देखील दिली. या कार्यक्रमात शहरातील आठ विधानसभा मतदार संघातील महाआघाडी, महायुतीसह मनसेचे उमेदवार सहभागी झाले होते.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, उपसभापती नीलम गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय बहिरट, भाजपाचे उमेदवार सिध्दार्थ शिरोळे, पर्वती विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अश्विनी कदम, रामदास फुटाणे, ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम, सलील कुलकर्णी, विभावरी देशपांडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळीनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांनी काही मान्यवरांसोबत संवाद देखील साधला. कार्यक्रमाचे आयोजन अभिनेते प्रविण तरडे, चित्रपट अभ्यासक विनोद सातव यांनी केले होते.