विधासभा निवडणुकीचा फटका पाळीव प्राण्यांना बसत असल्याचं समोर आलं आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी निवडणुकीचे कारण पुढे करत पाळीव मयत कुत्र्याचे दफन करण्यास नकार दिला आहे. याबद्दल त्यांच्याशी संवाद साधला असता आज रविवार असल्याने खोदकाम करणारे कर्मचारी सुट्टीवर असून अनेकजण निवडणुकीच्या कामकाजात व्यस्त असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

प्रदीप गायकवाड यांच्या घरातील दहा वर्षीय सोन्या नावाच्या कुत्र्याचा आजाराने मृत्यू झाला. मृतदेह घेऊन ते महानगरपालिकेच्या दफनभूमी येथे अंत्यविधी करण्यास गेले. मात्र, तिथे निवडणुकांचे कारण पुढे करत उद्या म्हणजेच सोमवारी येण्याचा सल्ला दिला. दरम्यान, मयत कुत्रा सोन्याचा मृतदेह दफनभूमी येथे ठेवून घेण्यात आला आहे. गायकवाड यांनी स्वतः वरिष्ठांशी संपर्क केला असता निवडणुकांचे कारण सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून पिंपरी-चिंचवड पालिकेचा नावलौकिक होतो. त्यांनी प्राण्यासाठी लाखो रुपये खर्च करून स्वतंत्र दफनभूमी बनवली. परंतु, आता तिथे वेगळाच प्रकार पाहायला मिळत आहे. गायकवाड यांच्याकडे श्वान परवाना असून कुत्र्यावरील कर देखील भरत होते अशी माहिती त्यांनी दिली आहे. मयत कुत्रा सोन्या हा गायकवाड कुटुंबाचा लाडका होता. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता. आज त्याचा अचानक मृत्यू झाला आहे. गायकवाड कुटुंब हे अंत्यविधी करण्यासाठी गेले असता हा भलताच प्रकार समोर आला आहे. दफनभूमीमध्ये अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरल्याचे देखील गायकवाड यांनी सांगितलं आहे, उद्या सोमवारी अंत्यविधी करण्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

“रविवार सुट्टी असल्याने कर्मचारी नसतात. आज मृतदेह जमा करून घेतो आणि उद्या दफन करतो. काही कर्मचारी आणि अधिकारी निवडणुकांमध्ये व्यस्त आहेत” अशी प्रतिक्रिया पशु वैद्यकीय अधिकारी अरुण दगडे यांनी दिली आहे.