सोलापुरात बलाढय़ उमेदवारांच्या प्रचाराची धुरा कुटुंबीयांकडेच

एजाज हुसेन मुजावर, सोलापूर

अकरा वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना वयाच्या ९४व्या वर्षी नातवाच्या विजयासाठी तर लेकीच्या हॅट्ट्रिकसाठी ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांना मतदारसंघांत वणवण करावी लागत आहे.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे सलग तिसऱ्यांदा निवडून जाण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करीत आहेत. आमदार प्रणिती शिंदे यांना आव्हान देणारे शिवसेनेचे दिलीप माने व सेनेचे बंडखोर महेश कोठे हे दोघेही पूर्वी काँग्रेसमध्येच होते. सोलापूर लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा धक्कादायक पराभव पचविणारे सुशीलकुमार शिंदे यांनी यंदा विधानसभा निवडणुकीत आपल्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यासाठी प्रचाराची धुरा त्यांनी स्वत:कडे घेतली आहे.

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी १९६२ पासून एक अपवाद वगळता सांगोला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मावळत्या विधानसभेत सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत.  वयाच्या ९४ व्या वर्षी शरीर साथ देत नसल्यामुळे त्यांनी निवडणुकांच्या राजकारणापासून निवृत्ती घेतली आहे. त्यांच्याऐवजी त्यांचे नातू डॉ. अनिकेत चंद्रकांत देशमुख यांची उमेदवारी आणली गेली आहे. आपल्या हयातीतच सांगोल्यात आपला राजकीय वारसदार आमदार म्हणून काम करताना पाहण्याची गणपतराव देशमुख यांची इच्छा आहे. त्यामुळे अर्थातच त्यांनी स्वत: नातवाच्या प्रचारात जातीने लक्ष घातले आहे. नातवाच्या प्रचारार्थ मतदारसंघात त्यांना फिरावे लागत आहे.

सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात पालकमंत्री विजय देशमुख हे निवडणूक लढवीत आहेत. देशमुख यांच्या वीरशैव लिंगायत समाजासह पद्मशाली समाज या दोन्ही प्रमुख घटकांवर भाजपचा मोठा प्रभाव आहे.  देशमुख यांच्यासमोर राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे यांचे आव्हान आहे. विजय देशमुख यांच्या  प्रचाराची धुरा त्यांचे पुत्र, नगरसेवक डॉ. किरण देशमुख हे सांभाळत आहेत.

दुसरीकडे सोलापूर दक्षिण मतदारसंघात भाजपचे नेते, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे परदेशात शिक्षण घेतलेले पुत्र मनीष देशमुख हे सांभाळत आहेत. मागील वर्षांपासून त्यांनी सोलापूर दक्षिण मतदारसंघात सामाजिक कार्याच्या माध्यमातून वैयक्तिक संपर्क वाढविला आहे. सोलापूर शहर मध्यमध्ये शिवसेनेचे उमेदवार, माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रचारात त्यांचे पुत्र पृथ्वीराज माने तर सेनेचे बंडखोर उमेदवार महेश कोठे यांच्या प्रचाराची जबाबदारी त्यांचे पुत्र प्रथमेश व पुतणे देवेंद्र कोठे यांनी हाती घेतली आहे.

पंढरपुरात भाजप पुरस्कृत ‘रयत क्रांती’चे सुधाकर परिचारक यांच्यासाठी त्यांचे पुतणे, आमदार प्रशांत परिचारक हे प्रचाराची धुरा वाहात आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार भारत भालके यांच्या प्रचारात त्यांचे पुत्र भगीरथ भालके हे सक्रिय आहेत.