अशोक तुपे, श्रीरामपूर

नगर जिल्ह्य़ात शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीला मोठा धक्का बसला. शिवसेनेला एकही जागा मिळविता आली नाही. काँग्रेसने दोन जागा कायम राखल्या. राष्ट्रवादीला मात्र घवघवीत यश मिळाले. प्रस्थापितांचे बुरूज ढासळले. गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांचा प्रभाव निष्प्रभ ठरला. ते विक्रमी मतांनी जिंकले असले तरी जिल्ह्य़ातील सर्व बारा जागा जिंकण्याची त्यांची घोषणा फोल ठरली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा करिष्मा तर चाललाच, पण जिल्ह्य़ाला रोहित पवारांचे नेतृत्व मिळाले. त्याने विखेंची डोकेदुखी भविष्यात वाढणार आहे.

नगर जिल्ह्य़ातील विधानसभेच्या बारा जागांपैकी राष्ट्रवादीला सहा जागा, भाजपला तीन, काँग्रेसला दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार विजयी झाला. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार व पालकमंत्री राम शिंदे, तसेच शिवाजी कर्डिले, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड हे भाजपचे चार आमदार तर विधानसभेचे उपसभापती विजय औटी, भाऊसाहेब कांबळे हे सेनेचे दोन आमदार पराभूत झाले. भाजपचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात हे मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले.

लोकसभा निवडणुकीत भाजपचे डॉ.सुजय विखे व शिवसेनेचे सदाशिव लोखंडे हे खासदार झाले. अकोले मतदारसंघ वगळता सर्व विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठे मताधिक्य होते. त्यामुळे माजी मंत्री मधुकर पिचड, आमदार वैभव पिचड, राजेंद्र नागवडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी भाजपत, तर आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप, नागवडे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, पांडुरंग अभंग या दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारून िरगणातून माघार घेतली. आमदार संग्राम जगताप व आशुतोष काळे यांचेही तळ्यातमळ्यात सुरू होते. पण राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी एकविचाराने उमेदवार दिले. मतदारसंघांची आदलाबदल केली. जिल्ह्य़ात बारा विरुद्ध शून्य अशी घोषणा देणाऱ्या विखेंचा करिष्मा चाललाच नाही. उलट कोपरगावमधून विखेंचे मेव्हुणे राजेश परजणे यांच्या बंडखोरीमुळे भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हेंचा पराभव झाला. विखे हे कर्डिले व मुरकुटे यांच्या प्रचारात फारसे सक्रिय नव्हते. त्यांचे समर्थक हे विरोधात काम करत होते. श्रीरामपूरचा आमदार हे आजपर्यंत विखे ठरवत आले. विखे यांनी प्रयत्न करूनही सेनेचे आमदार भाऊसाहेब कांबळे पराभूत झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी विखेंना शह देत श्रीरामपुरातून साहित्यिक लहु कानडे यांना निवडून आणले. माजी मंत्री मधुकर पिचड यांना पवारांची साथ सोडणे भोवले.

कर्जत-जामखेडमधून शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे निवडून आले. भविष्यात जिल्ह्य़ाच्या राजकारणात पवार हे अन्य नेत्यांसाठी राजकीयदृष्टय़ा अडचणीचे ठरू शकतात.

निवडणुकीत रेंगाळलेली कर्जमाफी, शेतमालाचे कोसळलेले भाव, पाणी प्रश्नाचे चुकलेले नियोजन, प्रस्थापितांचे पक्षांतर, निवडणुकीत घसरलेले कांद्याचे दर यामुळे सेना-भाजपची पीछेहाट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांचा करिष्मा चालला नाही. शरद पवारांबद्दल सहानुभूतीची लाट आली. दलित, मुस्लीम, मराठा व धनगर, माळी मतदार दोन्ही काँग्रेसकडे वळले. परिणामी युतीला फटका बसला.

नगर जिल्हा

एकूण जागा –   १२

राष्ट्रवादी –      ६

भाजप –        ३

काँग्रेस –       २

अपक्ष –        १