पाच वर्षांत महाराष्ट्रातील पाच लाख उद्योग, कारखाने बंद झाले आहेत. नाशिकमधील बॉश, महिंद्रा सारखे मोठे उद्योग अडचणीत सापडले असून कामगार कपात केली जात आहे. यामध्ये कित्येक जणांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. एचएएलमधील कामगारांना संप करावा लागत आहे. हे सर्व भाजप सरकारच्या कार्यपध्दतीचे फलित असल्याचे टिकास्त्र मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोडले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रचारात जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटविल्याचे सांगतात. पण, त्याचा महाराष्ट्राशी काय संबंध, असा प्रश्न करत राज यांनी भाजपमागील पाच वर्षांत काय केले ते न सांगता नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी हे मुद्दे पुढे रेटण्यात येत असल्याकडे लक्ष वेधले.

मनसेचे नाशिक मध्यचे उमेदवार नितीन भोसले आणि नाशिक पश्चिमचे उमेदवार दिलीप दातीर यांच्या प्रचारार्थ राज यांची गंगापूर रस्त्यावरील डोंगरे वसतिगृह मैदानावर सभा झाली. मनसेच्या महापालिकेतील सत्ताकाळात नाशिकमध्ये अनेक विकास कामे करण्यात आली. तरीदेखील मनसेला पराभव स्वीकारावा लागला. कामे करूनही पराभव स्वीकारावा लागल्याने पराभव जिव्हारी लागला. पण, नाशिकवरील प्रेम कमी झाले नसल्याचे राज यांनी सांगितले. सध्या नाशिक शहर ओरबाडण्याचा कारभार सुरू असून अशीच लोकं तुम्हांला आवडत असतील तर कशाला हवा प्रचार, असा प्रश्नही त्यांनी नाशिककरांना केला.  यावेळी त्यांनी बंद पडणारे उद्योग, सुखोई विमानांची बांधणी करणाऱ्या एचएएल कारखान्यातील संप, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी आदी मुद्यांवरून भाजपवर जोरदार हल्ला चढविला. या बिकट परिस्थितीत भाजप निवडणुकीची धमाल करीत असल्याचा टोला त्यांनी लगावला. इतकी वर्ष युतीत सडल्याचे सांगून महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकावणार असे सांगणारी शिवसेना आता भाजपसोबत निवडणुकीत ताट-वाटी घेऊन फिरत आहे. भाजपने सेनेला नाशिक, पुणे शहरात एकही जागा दिली नाही. युती सरकारच्या काळात महाराष्ट्राची वाट लागली. शहरे बकाल होत आहेत. त्याबद्दल कोणी बोलत नाही. लढाऊ विमाने तयार करणाऱ्या एचएएल कारखान्यातील कामगार अडचणीत सापडले आहेत.  भाजप एचएएल कोणाच्या तरी घशात घालण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप राज यांनी केला. राफेलसारखी विमाने आणून त्याची कंत्राटे अनिल अंबानीच्या कंपनीला दिली जातात. असे सर्व घडत असतांना आपण संवेदनाशुन्य आहोत का, त्याचा आपणास राग येत नाही का, असे प्रश्न त्यांनी केले. जनतेच्या मनातील राग विधानसभेत व्यक्त करण्यासाठी मनसेला प्रबळ विरोधी पक्ष बनविण्यासाठी साथ देण्याचे आवाहन राज यांनी केले.