मंदीच्या सावटाचा सर्वाधिक फटका येत्या काळात महाराष्ट्राला बसणार हे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या वाक्याचा अर्थ बघा की आर्थिक स्थिती धोक्यात आहे त्यावेळी ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. मंदीचा फटका याचा अर्थ म्हणजे अजून लाखो लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. अजून अनेक बँका बुडतील. अनेक गोष्टी वर येतील या सगळ्यातून सावरण्यासाठी सरकार काय करणार आहे माहित नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

सध्या भारताची वाटचाल रशियाच्या मार्गावर चालली आहे. कारण रशियात हीच परिस्थिती आहे काही ठराविक उद्योजकांनी सगळ्या गोष्टी वाटून घ्यायच्या. आत्ता भारतात तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण थंड बसलो आहोत. निवडणूक हा व्यवसाय होऊन बसला आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. हा आकडा खूप मोठा आहे मात्र तुम्हाला याचा अंदाज येणार नाही. मात्र याचं गणित काढलं तर दिवसाला तीन तासाला एक आत्महत्या या प्रमाणात शेतकऱ्यांनी गेल्या पाच वर्षात आत्महत्या केल्या आहेत असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. देशभरात मंदीची लाट आली आहे, बँका बुडत आहेत. देश आर्थिक संकटात आहे. पुढलं वर्ष कसं जाणार ते दिसून येतं आहे. ही जी काही स्थिती निर्माण झालं आहे ती मानवनिर्मित निर्णयामुळे होतं आहे असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. प्रभादेवीच्या सभेत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.