X
X

निवडणुकीत आमचा अजय ‘चंपा’ची चंपी करणार : राज ठाकरे

READ IN APP

राज ठाकरे यांची कसबा पेठेत प्रचारसभा

निवडणुकीत आमचा अजय ‘चंपा’ ची चंपी करणार असं म्हणत राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. कोल्हापूर सांगली या दोन शहरांमध्ये पूर आला आणि सरकारमधला मंत्री वाहून कोथरुडमध्ये आला असं म्हणत राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. एवढंच नाही तर ‘चंपा’ हे नाव पुणेकरांनी चंद्रकांत पाटील यांनी ठेवलं हे कळल्यावर पुणेकर नावं ठेवण्यात पटाईत असंही राज ठाकरेंनी म्हटलं. पुण्यातल्या कसबा पेठ या ठिकाणी आयोजित सभेत राज ठाकरे बोलत होते.

पुण्याच्या वैभवशाली इतिहासाचा सत्ताधाऱ्यांना विसर पडला आहे.  शिवस्मारक करु हे आश्वासन आघाडीच्या काळात देण्यात आलं होतं. त्यानंतर महायुतीच्या सरकारने स्मारक करण्याची घोषणा केली. त्यानंतर नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जलपूजन केले होते. आता ते कुठे केलं हेदेखील कुणाला सांगता येणार नाही असाही टोला राज ठाकरेंनी लगावला. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मारक उभारुनही झालं मात्र शिवस्मारक का उभं रहात नाही? असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला.

शिवस्मारक उभारण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांचं संवर्धन करा हीच शिवरायांना खरी मानवंदना ठरेल असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. आज शेतकरी आत्महत्या करत आहेत, यवतमाळ जिल्हा प्रसिद्ध कशासाठी आहे तर सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून. मुख्यमंत्र्यांची सभा असताना एका शेतकरी बांधवाने आत्महत्या केली. येणार तर आपलंच सरकार असा भाजपाचा टी शर्ट घालून त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली.

मतदान होतं आहे, बहुमत मिळतं आहे मग राज्य आणि देश यांच्या प्रगतीचा आलेख का खालावतो आहे असंही राज ठाकरेंनी विचारला. आज सिंचनाच्या नावानेही महायुतीच्या सत्तेतही बोंब आहे अशीही टीका राज ठाकरेंनी केली.

20
X