भाजपा आणि शिवसेनेचे नेते राज्यभरात ताटं वाट्या घेऊन फिरत आहेत अशा शब्दात राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात दहा रुपयात थाळी देण्याचं आश्वासन दिलं. तर त्यानंतर भाजपाने ५ रुपयात अटल भोजन योजनेची घोषणा केली. याच दोन्ही मुद्द्यांवरुन नाशिकच्या सभेत राज ठाकरे यांनी भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांवर निशाणा साधला. एक म्हणतोय दहा रुपयात जेवण देईन एक म्हणतो पाच रुपयात जेवण देईन. महाराष्ट्राला काय भीक लागली आहे का? असा सवाल करत राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली.

शिवसेना आणि भाजपा एकाही पक्षाला स्थानिक प्रश्नांशी काहीही घेणंदेणं नाही. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवायचा अशी घोषणा केली होती. नाशिकमध्ये एक सीट दिली नाही ते चाललं १२४ वर यांची सडलेली युती अडली असंही राज ठाकरेंनी शिवसेनेवर टीका केली. निवडणुकीच्या तोंडावर काय कामं केली ती बाजूला, पाच वर्षात काय केलं ते कोणीही सांगत नाही. भलत्याच गोष्टींवरती तुमचं लक्ष वळवायचं हेच प्रचारात सुरु आहे असाही आरोप राज ठाकरेंनी केला.

नाशिकमध्ये मनसेने पाच वर्षात जी कामं केली ती सत्ताधाऱ्यांना २५ वर्षांमध्ये करता आलं नाही असाही आरोप राज ठाकरेंनी नाशिकच्या भाषणात केला. माझा नाशिकमध्ये पराभव झाला मात्र माझे नाशिकवरचे प्रेम तसूभरही कमी झालं नाही असंही राज ठाकरे म्हणाले. नाशिक शहराच्या विकासासाठी महापालिकेवर आर्थिक बोजा पडू नये म्हणून मी सीएसआरमधून निधी आणला होता. शहर घडवणं हे माझं पॅशन आहे. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं हे माझं स्वप्न आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापना दिवसापासून बोलतो आहे ते स्वप्न माझं आजही आहे.

मी हेलिकॉप्टरने जाणं शक्यतो टाळतो कारण रस्त्यानं फिरलं की राज्यात काय सुरु आहे ते समजतं असं राज ठाकरे म्हणाले. सह्याद्रीच्या रांगा पाहून उर भरुन येतो. या रांगा सांगत असतात मी जसा ताठ कण्याने उभा आहे तसाच महाराष्ट्र ताठ कण्याने उभा राहिला पाहिजे. मात्र हाच महाराष्ट्र आज थंड बसला आहे. महाराष्ट्राची सळसळती मनगटं गेली कुठे? असा प्रश्न सह्याद्रीच्या रांगानाही पडत असावा असंही राज ठाकरे नाशिकच्या सभेत म्हणाले.